जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत व्हॅल्युएबल कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात हिंजवडी आयटी पार्क येथे 519.72 कोटी रुपये मोजून जमीन खरेदी केली आहे. मायक्रोसॉफ्टची हिंदुस्थानात अनेक डेटा सेंटर्स, डेव्हलपमेंट सेंटर्स आणि ऑफिसेस आहेत. या जमीनखरेदीमुळे त्यामध्ये आणखी भर पडणार असून, रोजगारनिर्मिती वाढणार आहे.
‘मायक्रोसॉफ्ट’चे हिंदुस्थानातील युनिट, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66 हजार 414.5 वर्ग मीटर म्हणजेच 16.4 एकर इतकी जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार गेल्या महिन्यात झाला. कंपनीने इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीकडून ही जमीन खरेदी केली. या व्यवहारासाठी 31.18 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे मायक्रोसॉफ्ट कंपनीने 2022 साली 25 एकर जमीन 328 कोटी रुपयांना खरेदी केली होती. याच वर्षी कंपनीने हैदराबादमध्ये 48 एकर जमिनीसाठी 267 कोटी रुपये मोजले होते. कंपनीने याआधी पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे डेटा सेंटर्स उभारली आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट’चे हिंदुस्थानात 23 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. कंपनीची बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे कार्यालये आहेत.