मोठा गाजावाजा झालेले ‘कू’ ऍप बंद होणार

2020 मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आलेले देसी कू ऍप सुरू करण्यात आले. परंतु अवघ्या चार वर्षांत हे ऍप बंद होणार आहे. अशी माहिती स्वतः कंपनीच्या संस्थापकांनी लिंक्डइनवरून दिली आहे. कू ऍप हे नेटकऱयांना पसंत न पडल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी धडपड करत होती. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीने हे ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कू कंपनीचे सहसंस्थापक मयंक बिदावतका यांनी नुकतीच लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली असून यात ही माहिती दिली आहे. चार वर्षांपूर्वी लाँच केलेले कू ऍपला आतापर्यंत 60 मिलियन म्हणजेच सहा कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले. हे ऍप वेगवेगळय़ा दहा भाषांत उपलब्ध करण्यात आले होते. कू ऍपवर दर महिन्याला दहा मिलियन सक्रिय युजर्स, 2.1 मिलियन रोजचे युजर्स, दरमहिन्याला दहा मिलियन पोस्ट आणि नऊ हजारांहून अधिक व्हीआयपी अकाऊंट होती.