म्हाडाच्या स्कॅनिंग विभागाची दुरवस्था; तडे गेलेले पत्रे, नादुरुस्त पंखे, तुटलेल्या खिडक्या

तडे गेलेले पत्रे, तुटलेल्या खिडक्यांमुळे कार्यालयात होणारा उंदीर-घुशींचा वावर, नादुरुस्त पंख्यांमुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याने घामाघूम झालेले कर्मचारी अशी दुरवस्था म्हाडा मुख्यालयातील स्कॅनिंग विभागाची झाली आहे. वारंवार तक्रार करूनही म्हाडाकडून या कार्यालयाची दुरुस्ती केली जात नाही. स्कॅनिंगसाठी आलेल्या महत्त्वाच्या फाईली उंदीर-घुशींनी कुरतडल्यास किंवा गळक्या छपरामुळे पावसाळ्यात पाणी पडून खराब झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. या कार्यालयातील महत्त्वांच्या फायली आणि कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यासाठी म्हाडाने 2013 साली स्टॉक होल्डिंग कंपनीला कंत्राट दिले आहे. या फायली स्कॅन करण्यासाठी म्हाडाने गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील टेरेसवर तात्पुरते पत्र्याच्या शेड उभारले आहे. याच कार्यालयात बसून स्टॉक होल्डिंग कंपनीचे 12 कंत्राटी कर्मचारी स्कॅनिंग करतात.

या विभागात म्हाडाच्या सर्व विभागातील महत्त्वाच्या फायली स्कॅनिंगसाठी येतात तरीही येथे कोणतीही सुविधा पुरवली जात नाही. फायली ठेवण्यासाठी कपाट नसल्यामुळे टेबलावर किंवा जमिनीवर फायलींचा ढीग पडलेला असतो. सध्या येथील 12 पैकी 6 पंखे बंद असल्याने कर्मचाऱ्यांना उकाड्यात काम करावे लागतेय. तुटलेल्या खिडक्यांमुळे कार्यालयात उंदीर आणि घुशींचा वावर असतो. पावसाळ्यात गळक्या छपरातून पाणी आत येते. त्यामुळे या फाईल वाचवण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. या विभागाची डागडुजी करावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही म्हाडाच्या पीपीडी विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.