म्हाडाची लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी, चितळसर येथील 1173 घरांचा समावेश

म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याचे कारण नाही. येत्या काही महिन्यांत म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे 2 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा समावेश असणार आहे.

म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे 30 हजार घरांची सोडत काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यांत म्हाडाच्या कुठल्या तरी मंडळाची सोडत काढण्याचे प्रस्तावित आहेत. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. आता या वर्षी पुन्हा एकदा सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या 1173 घरांसह 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे.

ठाणे पालिकेकडून ओसीची प्रतीक्षा

चितळसर येथे म्हाडाने 22 मजली सात इमारती उभारल्या असून रस्ता आणि पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही. ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.