अबब! म्हाडाचे घर तब्बल 1 कोटी 10 लाखाला

गोरेगावच्या प्रेमनगर येथे म्हाडा 332 हायफाय घराचा प्रकल्प उभारत आहे. या घरांच्या किमती किती असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस फूट फ्लॅटसाठी 1 कोटी 10 लाख तर उच्च उत्पन्न गटातील 979 चौरस फुटाच्या फ्लॅटसाठी 1 कोटी 40 लाख रुपये एवढी किंमत निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडातर्फे गोरेगावच्या प्रेमनगर येथे 39 मजली टॉवर उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून आतापर्यंत 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. वर्षअखेरीस टॉवरचे काम पूर्ण होणार आहे. जुलैअखेरीस म्हाडाच्या मुंबईतील सुमारे 1900 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून यात  या हायफाय घरांचा समावेश आहे. या घरांना कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरच यापुढे हायफाय घरांची निर्मिती

परवडणारी घरे बांधण्यासाठी ओळखल्या जाणाऱया म्हाडाने आता खासगी विकासकांना टक्कर देत गोरेगावमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्ंकग अशा हायफाय सुविधा असणाऱया आलिशान घरांचा प्रकल्प उभारला आहे. या पहिल्यावहिल्या ‘ड्रीम मॉडेल’ला उच्च आणि मध्यम गटातील अर्जदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय यावरच पुन्हा अशा आलिशान घरांची निर्मिती करायची की नाही, याबाबतचा निर्णय प्राधिकरण घेणार आहे.