>> मंगेश दराडे
म्हाडाने प्रथमच खासगी विकासकांना टक्कर देत गोरेगाव प्रेमनगर येथे जिम, स्विमिंग पूल, पोडियम पार्पिंग अशा हायफाय सुविधा असलेल्या 332 घरांचा प्रकल्प उभारला. नुकत्याच काढलेल्या लॉटरीत या घरांसाठी अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे म्हाडाची आता हायफाय घरांची हौस फिटली असून यापुढे सर्वसामान्यांना परवडणाऱया घरांवरच पह्कस करण्याचे प्राधिकरणाने ठरवले आहे.
म्हाडातर्फे गोरेगावच्या प्रेमनगर येथे 39 मजली टॉवर उभारण्याचे काम सुरू असून यात मध्यम उत्पन्न गटासाठी 227 तर उच्च उत्पन्न गटासाठी 105 फ्लॅट आहेत. सप्टेंबरमध्ये म्हाडाने 2030 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. त्यात या हायफाय घरांचादेखील समावेश होता. या घरांसाठी 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 33 लाख रुपयांपर्यंत किमती निश्चित केल्या होत्या. खासगी विकासकांच्या तुलनेत या घरांच्या किमती कमी असल्या तरी या घरांसाठी केवळ सात ते आठ हजारांच्या आसपास अर्ज प्राप्त झाले होते.
मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण 359 घरांकरिता 47,134 अर्ज तर अल्प उत्पन्न गटातील एकूण 627 घरांकरिता 48,762 अर्ज प्राप्त झाले होते. मध्यम उत्पन्न गटातील 768 घरांकरिता 11,461 अर्ज तसेच उच्च उत्पन्न गटातील 276 घरांसाठी 6454 अर्ज प्राप्त झाले होते.
कोटय़वधी रुपये मोजून घर खरेदी करणाऱयांसाठी मार्पेटमध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे हायफाय घरे बांधण्याऐवजी यापुढे आमचा फोकस अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यावर असणार आहे. – मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ