रखडलेले 17 एसआरए प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, हजारो कुटुंबियांना मिळणार दिलासा

विविध कारणात्सव वर्षानुवर्षे रखडलेले किंवा विकासकांनी अर्धवट सोडलेले म्हाडाच्या जमिनीवरील 17 एसआरए प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 24 हजार कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.

रहिवाशांचा विरोध, कायदेशीर पेच किंवा आर्थिक चणचण अशा विविध कारणांमुळे काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतात. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या 29 एसआरए प्रकल्पांची यादी प्राधिकरणाकडे आली होती. त्यापैकी रखडलेले 17 एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे.

गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली, मजास, दहिसर, चेंबूर, कुर्ला या भागांमध्ये हे प्रकल्प आहेत. जॉइंट व्हेंचरबाबत सरकारने निर्णय घेतल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करू, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रहिवाशांना 300 फुटाचे घर मिळणार

एसआरएला आपले अधिकार वापरून सदरचा भूखंड रिक्त करावा लागेल. भूखंड म्हाडाचा असल्याने परिशिष्ट 2 तयार करून पात्रता निश्चित करण्याचे काम म्हाडाच करेल. भूखंड रिक्त झाल्यावर आम्ही विकासक नेमून प्रत्यक्षात पुनर्विकासाला सुरुवात करू. पुनर्विकास होईपर्यंत रहिवाशांना आम्ही भाडे देऊ. साधारणपणे रहिवाशांना 300 फुटांचे घर मिळेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.