
वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली विरार–बोळींज येथील चार हजारांहून अधिक घरे विकण्यासाठी म्हाडा आता नवीन पर्याय अवलंबणार आहे. बोळींजमधील घरांची सुलभ हप्त्याने विक्री करण्याची म्हाडाच्या कोकण मंडळाची योजना असून 25 टक्के डाऊन पेमेंट भरल्यानंतर उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरण्याचा पर्याय खरेदीदाराला मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव कोकण मंडळातर्फे लवकरच मंजुरीसाठी म्हाडा प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे.
सुरुवातीला कनेक्टिव्हिटी आणि पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे गेल्या पाच वर्षांत अनेकदा लॉटरी काढूनदेखील बोळींजमधील घरांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 2277 सदनिका विक्रीसाठी काढण्यात आल्या होत्या. बस, ट्रेनसह परिसरात स्पेशल कॅम्पेन राबविण्यात आले. सूर्या प्रकल्पाचे पाणी येऊनही घरांची विक्री वाढली नाही. त्यानंतर म्हाडाने नव्या धोरणानुसार या घरांची विक्री करण्याचे ठरवले. शंभर किंवा त्यापेक्षा अधिक घरे एकगठ्ठा घेणाऱया संस्थांना 15 टक्के डिस्काऊंट देण्याची घोषणा केली. त्याकडेही अर्जदारांनी पाठ फिरवली. नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बोळींजमधील घरांची विक्री कशी करता येईल याबाबत विचारमंथन झाले. त्यात सुलभ हप्त्याने घरविक्री करण्यावर चर्चा झाली. 1980-85 दरम्यानदेखील म्हाडाने हा पर्याय निवडला होता.
विक्रीसाठी म्हाडाची एनओसी लागणार
केवळ 25 टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरण्याचा पर्याय मिळणार आहे. घराचा मासिक हप्ता हा भाडय़ापेक्षा थोडा अधिक असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांना भाडय़ाच्या घराऐवजी स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. सदरचे घर संबंधिताला मध्येच विकायचे असल्यास म्हाडाची एनओसी आवश्यक असणार आहे.
म्हाडासाठी डोकेदुखी
विरार-बोळींज येथील घरांची वर्षानुवर्षे विक्री होत नसल्याने म्हाडासाठी ही डोकेदुखी ठरतेय. धूळ खात पडलेल्या या घरांच्या देखभाल, कर, पाणी, लाईट बिल, लिफ्टचा मेंटेनन्स आणि सुरक्षा रक्षकाची नेमणूक या गोष्टींवर म्हाडाचे कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी म्हाडा नवनवीन शक्कल लढवत आहे.