ज्या दिवशी घराचा ताबा विजेत्याने घेतला आहे त्या दिवसापासून त्याच्याकडून मेंटेनन्स आणि मालमत्ता कराची आकारणी करावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ आगामी सोडतीतील विजेत्यांना मिळणार असून ज्या विजेत्यांनी यापूर्वी शुल्कांचा भरणा केला आहे त्यांना हा ठराव लागू होणार नाही. म्हाडामध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत लॉटरीतील विखुरलेल्या घराच्या विजेत्यावर प्रकल्प उभारल्यापासून मासिक सेवाशुल्क, मालमत्ता कर आकारणी करणे योग्य नसल्याचे सांगत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले, सोडतीपश्चात काही कारणांमुळे विजेत्याला घराचा ताबा विलंबाने होतो. घराचा ताबा दिल्यानंतर घराचे प्रलंबित शुल्काची मागणी मंडळांमार्फत करण्यात येते. मात्र, घराचा ताबा देईपर्यंत सगरची मालमत्ता ही मंडळाची असते. त्यामुळे त्याचा भुर्दंड विजेत्यांवर पडू नये. विजेत्यांनी घराचा ताबा घेतला त्या दिवसापासून त्याला सेवाशुल्क, मालमत्ता कर इत्यादी लागू करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.