अबब! ‘फाईल कॉम्पॅक्टर’साठी म्हाडा 3 कोटी रुपये खर्च करणार

महत्त्वाची कागदपत्रे आणि फायली सुरक्षित ठेवण्यासाठी म्हाडा तब्बल 3 कोटी 7 लाख रुपये खर्च करून आपल्या गोडाऊनमध्ये फाईल कॉम्पॅक्टर बसविणार आहे. यासाठी म्हाडातर्फे नुकतीच निविदा जारी करण्यात आली. मात्र कॉम्पॅक्टरवर एवढी मोठी पैशांची उधळपट्टी का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

म्हाडाने अलीकडेच गृहनिर्माण भवन या मुख्यालयात स्वच्छता अभियान राबवले होते. या अंतर्गत वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या फायलींचे ढीग बाहेर काढून त्यांचे आवश्यकतेनुसार अ, ब, क, ड असे वर्गीकरण केले. या साफसफाई मोहिमेत गंज लागलेली जुनी लोखंडी कपाटेदेखील भंगारात काढली आहेत.

वर्गीकरणानंतर फायली आणि कागदपत्रे गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली असून या फायलींचे टप्प्याटप्प्याने स्कॅनिंग केले जाणार आहे. दरम्यान, याबाबत एका अधिकाऱ्याला विचारले असता गोडाऊनमधील कमी जागेत जास्त फाईल ठेवता याव्यात, जागोजागी फायलींचे ढीग दिसू नयेत तसेच फायली खराब होऊ नयेत यासाठी कॉम्पॅक्टर बसवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.