
म्हाडाच्या गृहनिर्माण भवन या मुख्यालयाच्या आवारात सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. तब्बल सवा कोटी रुपये खर्च करून वर्षभरात येथे गार्डन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यालयाला नवा लूक मिळणार असून नुकतीच म्हाडाने यासंदर्भात निविदा जारी केली आहे.
वांद्रे पूर्व कलानगर येथील गृहनिर्माण भवन या इमारतीमध्ये म्हाडाचे मुख्यालय आहे. मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये या इमारतीत असून दिवसाला हजारो रहिवासी विविध कामानिमित्त येथे भेट देतात. सध्या मुख्यालयात येणाऱया अभ्यागतांसाठी गृहनिर्माण भवनाच्या आवारात फारशा सुविधा नाहीत. त्यामुळे कामानिमित्त येणाऱया सर्वसामान्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण भवनाच्या आवारात गार्डन उभारण्यात येणार आहे.
n गृहनिर्माण भवनातील उद्यानात वातावरण प्रफुल्लित करण्यासाठी कॅना, स्पायडर लिली, गोल्डन बांबू, हेलिकोनिया, क्रिनम लिली, डेट पाल्स अशी आकर्षक झाडे लावण्यात येणार आहेत. याशिवाय येणाऱया- जाणाऱयांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तसेच सावलीसाठी शेडदेखील असणार आहे.