एसआरएचे रखडलेले तीन प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, शेकडो रहिवाशांना मिळणार दिलासा

विविध कारणांनी वर्षानुवर्षे रखडलेले एसआरएचे तीन प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे. जोगेश्वरी येथील साईबाबा सहकारी गृहनिर्माण संस्था, कुर्ला नेहरूनगर येथील श्रमिकनगर संस्था आणि चेंबूर येथील जागृती संस्था हे तीन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएने म्हाडाला हिरवा पंदील दिला आहे. त्यामुळे शेकडो रहिवाशांना दिलासा मिळाला.

वर्षानुवर्षे रखडलेले एसआरए प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व शासकीय यंत्रणा यांच्या समवेत संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एसआरएच्या रखडलेल्या एकूण 228 योजनांचा समावेश आहे. त्यातील 21 योजना म्हाडाच्या भूखंडावर असल्याने ते प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली आहे.  एसआरए प्राधिकरणाकडे म्हाडाने मंजुरीसाठी सादर केलेल्या तीन प्रस्तावांना एसआरएने  मंजुरी दिली असून म्हाडाला उर्वरित योजनांचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.