मालवणीतील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, 14 हजार झोपडीधारकांना दिलासा

मालवणीच्या राजीव गांधी नगर येथील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प नियोजन सल्लागार (पीएमसी) आणि आर्किटेक्टची नियुक्ती करण्यासाठी म्हाडाने नुकतीच निविदा जारी केली आहे. या प्रकल्पामुळे तब्बल 14 हजार झोपडीधारकांना दिलासा मिळणार असून 6 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी यासाठी म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या 17 प्रकल्पांचा पुनर्विकास म्हाडा आणि एसआरए प्राधिकरण यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर केला जाणार आहे. या माध्यमातून म्हाडाला 25 हजार घरे लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत. या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा प्रकल्प मालवणीच्या राजीव गांधी नगर येथे आहे. 51 हेक्टर जागेवरील या प्रकल्पात सुमारे 14 हजार झोपडीधारक आहेत.

एसआरएच्या नियमानुसार घरे मिळणार

म्हाडाने मालवणीतील रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून प्रकल्प नियोजन सल्लागारआणि आर्किटेक्टची नेमणूक करणार आहे. त्यानंतर विकासक नेमून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण म्हाडाच करणार असून त्यांना एसआरएच्या नियमानुसार घरे दिली जाणार आहेत.