संक्रमण शिबिराच्या खुराड्यातून होणार सुटका, मास्टर लिस्टमधील 100 घरांसाठी गुरुवारी सोडत; माझगावसह दादर, वडाळा, माहीममधील घरांचा समावेश

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधील 100 पात्र भाडेकरू-रहिवाशांना हक्काच्या घरांचे वितरण करण्यासाठी गुरुवार 24 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या या रहिवाशांचा हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. माझगाव, दादर, वडाळा आणि माहीम या परिसरात ही घरे असून यातील सर्वाधिक घरे माझगाव येथे आहेत. 300 ते 750 चौरस फुटांची ही घरे आहेत.

उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू किंवा रहिवाशांना निष्कासन सूचना देऊन इमारत खाली करण्यात आली आहे. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झाल्या आहेत. मात्र कमी गाळे बांधले गेले आहेत अशा वंचित मूळ भाडेकरू रहिवाशी यांना घर देण्यासाठी मास्टर लिस्ट सोडत काढण्यात येते. त्यासाठी म्हाडातर्फे रहिवाशांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. आलेले अर्ज संबंधित वॉर्डला पाठवून अधिकाऱयांकडून अहवाल मागवला जातो. त्यानंतर मास्टर लिस्ट कमिटी रहिवाशांच्या पात्र-अपात्रता संदर्भात निर्णय घेतला जातो.