अबब! म्हाडाचे दुकान तब्बल 14 कोटींना, गोरेगावातील व्यावसायिक गाळय़ासाठी लागली रग्गड बोली

 

सर्वसामान्यांना परवडणाऱया दरात घरे देणाऱया म्हाडाने व्यावसायिक गाळय़ांच्या विक्रीतून भरघोस कमाई केली. नुकत्याच पार पडलेल्या ई-लिलावात गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर येथील म्हाडाच्या एका व्यावसायिक गाळय़ासाठी तब्बल 13 कोटी 93 लाख रुपयांची बोली लागली. बँक किंवा एटीएमसाठी आरक्षित असलेल्या या गाळय़ासाठी तीन अर्जदारांमध्ये चुरस होती. म्हाडाने या गाळय़ासाठी 13 कोटी 92 लाख 59 हजार रुपयांची बेस प्राईज ठरवली होती, त्यापेक्षा 40 हजार रुपयांची अधिक बोली लागली.

घरांसोबत म्हाडातर्फे व्यावसायिक गाळेदेखील बांधण्यात येतात. अशा विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांच्या विक्रीसाठी म्हाडाने फेब्रुवारीच्या शेवटी जाहिरात काढली होती. यात मालवणीतील सर्वाधिक 57 दुकानांचा समावेश होता. दुकानांसाठी 604 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते. सुरुवातीला ई-लिलावासाठी 19 मार्चला बोली लागणार होती. अखेर आचारसंहितेमुळे रखडलेला दुकानांचा लिलाव 27 जूनला पार पडला.

170 कोटी रुपयांची कमाई

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या 173 दुकानांपैकी 61 दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला. यात स्वदेशी मिल 3, मुलुंड गव्हाणपाडा 1, तुंगा पवई 2, चारकोप 10, मालवणी 31, बिंबिसार 5 आणि जोगेश्वरी येथील एका गाळय़ाचा समावेश आहे. तर 7 ते 8 अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले. उर्वरित दुकानांच्या विक्रीतून 170 कोटी रुपयांची कमाई होईल, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱयाने दिली. विजेत्यांना स्वीकृतीसाठी दहा दिवसांची मुदत दिली असून बोलीच्या दहा टक्के रक्कम भरल्यावर त्यांना बँकेच्या लोनसाठी एनओसी दिली जाईल, असेही अधिकाऱयाने सांगितले.