मास्टर लिस्टमधील 30 घरांना प्रतिसादच नाही, म्हाडाने पाठवले स्मरणपत्र

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या मास्टर लिस्टमधील रहिवाशांसाठी म्हाडाने गतवर्षी डिसेंबरला सोडत काढली. या सोडतीमधील पात्र 158 विजेत्यांना जुलैत देकारपत्र देण्यात आले होते. त्यापैकी 30 विजेत्यांनी अद्यापही घरासाठी स्वीपृती दर्शवलेली नसल्यामुळे म्हाडाकडून या विजेत्यांना स्मरणपत्र पाठवले आहे.

म्हाडाने गतवर्षी 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढली. काही अर्जदारांनी बोगस कागदपत्रे सादर म्हाडाची दिशाभूल केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर सोडतीमधील सर्वच विजेत्यांची पुन्हा पात्रता पडताळणी करण्यात आली. पात्र ठरलेल्यांपैकी 158 विजेत्यांना जुलैमध्ये देकारपत्र देण्यात आले होते. सहा महिने उलटले तरी अद्याप 30 विजेत्यांनी घरासाठी स्वीपृती दर्शवलेली नाही. विजेत्यांपैकी काही जणांनी लॉटरीत त्यांना आवडीचे घर लागले नसल्याचे कारण दिले तर काहींनी मुलांच्या शाळेचे कारण देत घरासाठी अद्याप स्वीकृती दर्शवलेली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.