20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी म्हाडाच्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांकडून अवाच्या सवा पैसे उकळणाऱ्या विकासकांची आता काही खैर नाही. सोमवारी पार पडलेल्या म्हाडाच्या लोकशाही दिनात दोन अर्जदारांनी विकासकाकडून किमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी होत असल्याची तक्रार थेट म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे मांडली. या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित विकासकाबरोबर पुढील आठवडय़ात बैठक घेण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी अधिकाऱयांना दिले.
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात प्राप्त 13 अर्जांवर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. यापैकी सहा अर्ज मुंबई मंडळाशी, चार अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व तीन अर्ज कोकण मंडळाशी संबंधित होते. म्हाडा कोकण मंडळातर्फे जाहीर सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील हायलँड स्प्रिंग या योजनेत विजेत्या पात्र अर्जदारांकडून संबंधित विकासक वाढीव किमतीची मागणी करीत असून त्याबाबत व इतर मुद्दय़ांबाबत लक्ष घालण्याची मागणी यावेळी अर्जदार अरविंद अदाटे आणि गोविंद करवा यांनी केली. दरम्यान, आजतागायत तिन्ही लोकशाही दिन मिळून 41 अर्ज प्राप्त झाले असून 40 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.