शेवटच्या दिवशी ‘पेमेंट फेल’चा फटका, शेकडो अर्जदार चिंतेत

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. अनेक इच्छुकांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करत शेवटच्या दिवशी अनामत रक्कम भरण्याचा प्रयत्न केला, परंतु पेमेंट फेलचे मेसेज येऊन खात्यातून पैसे कट झाल्यामुळे आपला अर्ज जमा झालाय की नाही, आपण लॉटरीपासून मुकणार का, असे प्रश्न शेकडो अर्जदारांना सतावत होते.

म्हाडाने मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली असून इच्छुकांना गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची आणि रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची मुदत होती. अर्जदारांच्या तक्रारीनंतर ऐनवेळी अर्ज तसेच अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत करण्यात आली. अनामत रक्कम 50 हजारांच्या घरात असल्यामुळे अनेकांनी शेवटच्या दिवशी पैसे भरणे पसंत केले. ऐनवेळी पैसे भरणे या अर्जदारांना चांगलेच महागात पडले.

म्हाडाच्या संकेतस्थळावर अनामत रक्कम भरल्यानंतर ‘पेमेंट फेल’चे मेसेज अनेकांना आले. तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले असतील तर एक ते दोन दिवसांत अकाऊंटमध्ये परत येतील, असा मेसेज साईटवर झळकत होता. आधीच अर्जदारांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून म्हाडाचा फॉर्म भरला. त्यातच शेवटच्या दिवशी पेमेंट फेल होत अकाऊंटमधून पैसे कापले गेल्याने पुन्हा अनामत रक्कम भरण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करायची, अकाऊंटमधून कापलेले पैसे दोन दिवसांनी पुन्हा जमा झाले तर याचा अर्थ आपला अर्जच म्हाडाकडे सबमिट झाला नाही आणि यंदाही आपले घराचे स्वप्न अधुरे राहणार का, अशी चिंता अर्जदारांना भेडसावत होती.

आतापर्यंत 1 लाख 31 हजार अर्ज

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 1 लाख 31 हजार 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1 लाख 8 हजार 194 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते.