मुंबईतल्या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाचे लवकरच नवीन धोरण येणार आहे. म्हाडाची एनओसी मिळूनही गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम रखडवणाऱया मालकांना दिलेली एनओसी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज शहर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत घेण्यात आला.
दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये डीपीडीसीची बैठक झाली. मुंबई शहरातील आमदारांनी विविध प्रश्न मांडले. शिवसेना आमदार महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातील भिकू बिल्डिंग आणि मुलजी हाऊस या रखडलेल्या इमारतींचा प्रश्न मांडला. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने मालकांना एनओसी दिलेली आहे. पण मालक पुनर्विकास करीत नाही. उलट भाडेकरूंवरच केसेस टाकत असल्याचे महेश सावंत यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. त्यावर या इमारतींना दिलेली एनओसी रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय शिवाजी पार्कमधील धुळीची समस्या, नुतनीकरण, स्मशानभूमी, माहीमचा किल्ला अशा विविध विषयांवर महेश सावंत यांनी प्रश्न मांडले.
केईएम रुग्णालयाला निधी
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालयाचा तसेच अभ्युदय नगरचा प्रश्न मांडला. केईएम रुग्णालात सिटी स्कॅन मशिन्स, एमआरआय मशीन्स, सोनोग्राफी मशीन्स नाहीत. कलर डॉप्लरवरच्या चाचण्यांसाठी सहा महिने प्रतिक्षा करावी लागत असल्याचे सांगितले. त्यावर केईएममधील या मशीन्ससाठी डीपीडीसी किंवा पालिकेकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिले.
अभ्युदय नगरवासीयांना 635 चौरस फुटांचे घर द्या!
अभ्युदय नगरचा पुनर्विकास करताना म्हाडाने डेव्हलमेंट चार्जेस म्हणून सुमारे 2700 कोटी रुपये मागितले आहे. तर हौसिंग स्टाँक म्हणून म्हाडाने पाच लाख फूट जागा मागितली आहे. यामध्ये अभ्युदय नगरला सवलत देण्याची मागणी अजय चौधरी यांनी केली. अभ्युदयनगरवासीयांना पुनर्विकासात 635 चौरस फूटांची जागाच मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी अजय चौधरी यांनी केली. वरळी शिवडी कनेक्टरमधील प्रकल्पबाधितांना त्याच ठिकाणी घरे देण्याची मागणीही केली. मुंबईतल्या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाचे धोरण येणार असल्याचे अजय चौधरी यांनी सांगितले.
मुंबईसाठी 690 कोटी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहरच्या 690 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडय़ास मान्यता देण्यात आली.
रोहिंग्यांचे पुन्हा पडसाद
काwशल्य विकास मंत्री लोढा यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्ये यांची जिह्यात मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याचे सूचना दिल्या. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी संदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
शिंदेंनी केली रखडपट्टी
एकनाथ शिंदे या बैठकीला दोन तास विलंबाने आले. त्यामुळे सर्व आमदार, पालिका, म्हाडा आणि जिल्हाधिकाऱयांची रखडपट्टी झाली. त्याबद्दल शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
अदानीला सवलती मग अभ्युदयनगरला का नाही?
धारावी प्रकल्पात अदानींवर सवलतींचा वर्षाव केला जातो. मग अभ्युदय नगरच्या पुनर्विकासात सवलती देताना हात आखडता का घेता, असा सवाल अजय चौधरी यांनी केला.