म्हाडाच्या भोंगळ कारभाराचा फटका; मास्टर लिस्टमधील विजेते सहा महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत

संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाने डिसेंबरमध्ये मास्टर लिस्टमधील रहिवाशांची पहिली संगणकीय सोडत काढली. सोडतीचा निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटले तरी विजेत्यांना अद्याप देकारपत्र देखील मिळाले नाही. त्यामुळे हक्काच्या घराचा ताबा लवकर मिळेल, या आशेवर राहिलेल्या शेकडो विजेत्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला असून म्हाडाच्या भोंगळ कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची  संगणकीय सोडत काढली होती. संगणकीय सोडतीनंतर अर्जदाराने 15 दिवसांच्या आत उपमुख्य अधिकारी, पुनर्रचित गाळे विभाग यांच्याकडे स्वीकृती पत्र सादर करणे तसेच 45 दिवसांच्या आत ताबा घेणे बंधनकारक आहे, असे म्हाडाने म्हटले होते. मात्र, सोडत जाहीर होऊन सहा महिने झाले तरी विजेत्यांना अद्याप देकारपत्र मिळालेले नाही.

आचारसंहितेनंतर मिळणार देकारपत्र

काही अर्जदारांनी खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. त्यामुळे सोडतीमधील सर्वच विजेत्यांची पुन्हा पात्रता पडताळणी करण्याचा निर्णय मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने घेतला. पडताळणीचे काम आता अंतिम टप्प्यात असून आचारसंहितेनंतर विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.