पार्किंगच्या विळख्यात अडकला म्हाडाचा हिरकणी कक्ष, तीन महिन्यांपासून वापराविना धूळ खात

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या आवारातील पार्किंगमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. पार्किंगमधील गाडय़ांच्या गर्दीमुळे हिरकणी कक्ष सहज कुणाच्या लक्षात येत नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हा कक्ष वापराविना धूळ खात पडला आहे. त्यातच पार्किंगमधील गाडय़ांच्या गर्दीतून वाट काढत ताह्या बाळासह महिलांनी या कक्षापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण भवनाच्या इमारतीमध्ये मुंबई मंडळ, कोकण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. घराचा ताबा तसेच विविध कामानिमित्त ताह्या बाळासह म्हाडा भवनात येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र हा हिरकणी कक्ष उभारताना निवडलेली जागा गैरसोयीची ठरतेय. पार्किंगच्या एका कोपऱयात हा कक्ष उभारण्यात आला आहे. काही वेळा पार्किंगमधील गाडय़ा हिरकणी कक्षाच्या दरवाजाला अगदी चिटकून उभ्या असतात. त्यामुळे या कक्षात ताह्या बाळासह महिलांनी प्रवेश करायचा कसा, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अडगळीत उभारण्यात आलेल्या या कक्षाची जागा बदलण्यात यावी, अशी मागणीदेखील आता जोर धरू लागली आहे.

सोयीसुविधांचा अभाव

हिरकणी कक्षात येणाऱ्या महिलांना पिण्यासाठी आरओचे पाणी, वॉश बेसिंग आणि स्वच्छतागृह या सुविधा देणेदेखील बंधनकारक आहे, मात्र म्हाडातील या हिरकणी कक्षात या सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे हा कक्ष केवळ दिखाव्यासाठी उभारला आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.