म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोठा गाजावाजा करत यंदाच्या सोडतीमधील 370 घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी ऐन लॉटरीच्या तोंडावर 14 घरांच्या किमती कमी होण्याऐवजी उलट 12 ते 13 लाखांनी वाढविल्या आहेत. त्यामुळे 43 लाख 97 हजार 959 रुपये असलेली घराची किंमत 56 लाख 79 हजार 313 रुपये झाली आहे. घरांच्या किमती निश्चित करताना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी घोळ घातल्यामुळे ऐन वेळी किमतीत बदल करण्याची नामुष्की म्हाडावर ओढावली आहे.
म्हाडाच्या यंदाच्या 2030 घरांच्या सोडतीत विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांचादेखील समावेश आहे. या घरांच्या किमती या रेडीरेकनर दराच्या 110 टक्के दराने निश्चित करण्यात येतात. या घरांच्या किमती कोट्यवधींमध्ये असल्यामुळे म्हाडावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
अखेर या 370 घरांच्या किमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. त्यानुसार कुर्ल्यातील अल्प गटातील स्वानंद प्रकल्पातील 14 घरांच्या किमतीदेखील कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र या घरांच्या किमती कमी होण्याऐवजी उलट 12 ते 13 लाखांनी वाढल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे किमतीत सुधारणा
घरांच्या किमती 2024-25च्या रेडीरेकनरनुसार निश्चित करण्यात आल्या. मात्र अधिकाऱ्याने रेडीरेकनरचे चुकीचे दर आकारल्यामुळे आता या घरांची सुधारित किंमत पुन्हा जाहीर केली गेली आहे, अशी माहिती मुंबई मंडळातर्फे देण्यात आली.