
व्यावसायिक गाळय़ांच्या पाठोपाठ आता भूखंडांच्या ई-लिलावातून म्हाडा मालामाल झाली असून पाच भूखंडांच्या विक्रीतून तब्बल 192 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात ग्लोबल हेल्थ लि. यांच्या मेदांता रुग्णालयाने ओशिवरा येथील 8850.25 चौरस मीटरचा भूखंड तब्बल 125 कोटी रुपयांची बोली लावून मिळवला आहे. विशेष म्हणजे, म्हाडातर्फे या भूखंडाकरिता 67 कोटी 49 लाख इतकी मुळ किंमत ठरविण्यात आली होती. म्हणजेच हा भूखंड विकून जवळपास दुप्पट कमाई केली आहे.
म्हाडातर्फे मुंबईतील एक रुग्णालय आणि चार शैक्षणिक संस्थाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडांच्या विक्रीसाठी ई-लिलावातील निविदा मंगळवारी उघडण्यात आली. यात मालाड-मालवणी येथील 1989.72 चौरस मीटरचा शैक्षणिक सुविधा भूखंड प्रगत शिक्षण संस्थेने 11 कोटींची सर्वाधिक बोली लावून मिळवला आहे तसेच टागोर नगर मौजे हरियाली येथील 2019.49 चौरस मीटरचा शैक्षणिक भूखंड 12 कोटी 21 लाखांची बोली लावून जिंकला आहे. मंडळातर्फे या सुविधा भूखंडांकरिता अनुक्रमे 10 कोटी 66 लाख आणि 11 कोटी 81 लाख इतकी मूळ किंमत ठरविण्यात आली होती. त्याचबरोबर विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील महिलांच्या पॉलिटेक्निक संस्थेकरिता आरक्षित 3010.23 चौरस मीटरचा भूखंड नवचेतना धर्मादाय संस्थेने 18 कोटी 5 लाखांची बोली लावून जिंकला. या भूखंडाकरिता म्हाडाने 17 कोटी 75 लाख अशी मूळ किंमत जाहीर केली होती. टागोर नगर, विक्रोळी येथील 3360.15 चौरस मीटरचा शैक्षणिक आरक्षणाचा भूखंड राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेला मिळाला आहे. मुंबई मंडळातर्फे या भूखंडाची किंमत 21.52 कोटी इतकी ठरविण्यात आली होती, तर हा भूखंड 26 कोटी रुपयांना देण्यात येणार आहे.
11 भूखंडांना प्रतिसादच नाही
म्हाडातर्फे 16 भूखंडांचा ई-लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी केवळ पाच भूखंडांसाठी बोली लावल्या असून उर्वरित 11 भूखंडांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. खेळाचे मैदान, एक्झिबिशन हॉल असे विविध आरक्षण या भूखंडांवर होते.