
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील एक हजार उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
म्हाडा मुख्यालयात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ अंतर्गत विविध कामांचा आढावा घेण्यासाठी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयस्वाल म्हणाले, मंडळातील अंदाजे 13 हजार उपकरप्राप्त इमारतींचे नव्याने संरचनात्मक सल्लागार यांची नियुक्ती करून पुढील एक वर्षात स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शासनाच्या कृती आराखडय़ात 500 उपकरप्राप्त इमारतींची संरचनात्मक परीनिरीक्षण करण्याची बाब समाविष्ट आहे. त्यानुसार आजतागायत एकूण 171 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून 32 इमारतींचा संरचनात्मक परीनिरीक्षण अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सदनिकांचा पूर्ण तपशील उपलब्ध होईल, असेही जयस्वाल म्हणाले.
पुनर्विकासाबाबत लवकर कार्यवाही करा
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सुमारे 13 हजार उपकरप्राप्त इमारतींना कलम 79 (अ) 1 (अ) अंतर्गत नोटीस देण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या. कलम 91 (अ) अंतर्गत संपादित करण्यात येणाऱया व संपादित केलेल्या मालमत्तांच्या पुनर्विकासाबाबतची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱयांना दिले.
भाडेपट्टा करार, अभिहस्तांतरणासाठी ऑनलाइन प्रणाली
मुंबई मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या 114 वसाहतींपैकी बहुतांश वसाहती जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करणे क्रमप्राप्त आहे. या इमारती व भूखंडांचा भाडेपट्टा करार व अभिहस्तांतरण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता प्रणाली विकसित करण्याचे आदेश संजीव जयस्वाल यांनी
मिळकत व्यवस्थापक विभागांच्या आढावा बैठकीत दिले.
इमारत, गृहनिर्माण संस्थांचे सर्वेक्षण करा
म्हाडाने आजवर राज्यभरात उभारलेल्या 9 लाख घरांपैकी सुमारे 2.5 लाख घरे केवळ मुंबई मंडळाच्या अखत्यारीत आहेत. मिळकत व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील इमारतींची व गृहनिर्माण संस्थांची यादी तयार करून दोन आठवडय़ांच्या कालावधीत सादर करावी. तसेच त्यांचे बाह्य यंत्रणांच्या सहाय्याने सर्वेक्षण करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा. यामुळे म्हाडाकडे घरांचा पूर्ण तपशील उपलब्ध होईल असेही जयस्वाल म्हणाले.