मागणी असेल तरच घरे बांधणार, 11 हजारांहून अधिक घरे धूळ खात पडल्यानंतर म्हाडाला जाग

विक्रीअभावी घरे धूळ खात पडू नये यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळात अंबरनाथमध्ये 2531 घरांचा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करून लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे. त्यानंतरच ही घरे उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

म्हाडाचे मुंबई मंडळ वगळता कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या मंडळात 11 हजारांहून अधिक घरे धूळ खात पडलेली आहेत. वर्षानुवर्षे विक्रीविना पडून असलेल्या या घरांमुळे म्हाडाचा जवळपास तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी अडकला आहे. या घरांचा वेळोवेळी लॉटरीत समावेश करूनही विक्री होत नसल्याने त्यांची विक्री करायची कशी, असा पेच म्हाडासमोर आहे. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. अंबरनाथमध्ये शिवगंगानगर आणि कोहोज खुंटवली येथे अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 2531 घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, मात्र थेट गृहप्रकल्प न राबवता कोकण मंडळातर्फे 11 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मागणी मूल्यमापन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावरून या विभागात लोकांची घराला किती मागणी आहे याचा अंदाज बांधता येणार आहे. https://demandassessmentcitizen.mhada.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन नागरिकांना सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे.