म्हाडाकडून संक्रमण शिबिराची झाडाझडती, महिनाभरात तीन हजारांहून अधिक रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

म्हाडाने मुंबई शहर व उपनगरातील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात केली असून महिनाभरात तीन हजारांहून अधिक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या सर्वेक्षणाच्या कामासाठी म्हाडाने 17 ते 18 टीम नेमल्या असून दोन महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे म्हाडाने नियोजन आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे असून यात 20 हजार घरे आहेत. शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे ‘अ’, ‘ब’ व ‘क’ प्रमाणे वर्गीकरण करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चार दिवस आधी संबंधित संक्रमण शिबिरात म्हाडाकडून जनजागृती केली जाते तसेच रहिवाशांना ठरावीक वेळेत घरीच थांबण्याची विनंती केली जाते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.