म्हाडाच्या 2264 घरांची सोडत 5 फेब्रुवारीला

तीन वेळा मुदतवाढ दिल्याने म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची ऑनलाईन सोडत कधी होणार याकडे हजारो अर्जदारांचे डोळे लागले होते. अखेर या सोडतीला मुहूर्त ठरला आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृह येथे ऑनलाईन सोडत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले, अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सोडत आता 31 जानेवारीऐवजी 5 फेब्रुवारी रोजी होईल. कोकण मंडळाच्या सोडतीत म्हणावे तसे अर्ज न आल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

कुठे किती घरे

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हाडाने कोकण मंडळाच्या घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 594 घरे, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 घरे, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या 728 घरांसह रोहा-रायगड व ओरोस-सिंधुदुर्ग येथे 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सुरुवातीला ऑनलाईन सोडत 27 डिसेंबरला होणार होती. त्यानंतर 21 जानेवारी आणि 31 जानेवारी अशी सोडतीची तारीख ठरवण्यात आली होती.