
मुंबई–कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून बरसणाऱया पावसाचे धुमशान सुरूच असून आजही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिली. कोकणातील अनेक नद्यांनी इशारा पातळी पार केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबईतही जोरदार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला. सकाळच्या सत्रात तिन्ही मार्गांवरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले.
हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांसह मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते कोकणपट्टय़ामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह वसई, विरार या भागांतही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने पालघर जिह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि डोंबिवली उपनगरातही जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अंधेरी सब वे बंद करावा लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याने या ठिकाणची वाहतूक एस. व्ही. मार्गावर वळवण्यात आली. मार्गात पाणी साचल्याने बेस्ट मार्गात बदल करावा लागला. मालाड सब वे, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. भांडुप, घाटकोपर, दादर टीटी, लालबाग, भायखळा, अंधेरी, मालाड, वांद्रे, नाना चौक, गोवंडी- मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी, शीव गांधी मार्पेट, वडाळा आदी सखल भागांत पाणी साचले. द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूककाsंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली, मात्र रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला.
या जिह्यांना हवामान खात्याचा इशारा मुसळधार ते अतिमुसळधार
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा.
अतिवृष्टी
मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर, पालघर, कोल्हापूर, पुणे.
वादळी वाऱयासह पाऊस
धुळे, जळगाव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ.
‘बेस्ट’चे मार्ग वळवले, वेळापत्रकात बदल
जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने व शीतल सिनेमा मार्गावर पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 7, 302, 303, 517, 322 मगन नथुराम रोड, काळेमार्गे जुना आग्रा रोड कमानीमार्गे वळवण्यात आल्या. तसेच आरे युनिट क्रमांक 22 येथे पाणी साचल्यामुळे बस क्रमांक 460, 488 व्होई सीप्झ-मरोळ मरोशी दोन्ही दिशांनी वळविण्यात आल्या.