
महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह वादळी पाऊस पडणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला ‘खबरदारी’चा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राजस्थानकडून येणाऱ्या गरम हवेमुळे सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी अवकाळीच्या शक्यतेने नवे संकट उभे ठाकले आहे.
आधीच राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने पिके आणि बागायतींची हानी झाली असताना हवामान विभागाच्या नव्या वर्दीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.