आनंदवार्ता! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

कडक उन्हाने आटत चाललेल्या धरणांमुळे मुंबईसह महाराष्ट्र आणि अनेक राज्यांवर घोंघावणारे पाणीसंकट, शेतीला पाणी नसल्याने करपून चाललेली पिके, अशा भयंकर परिस्थितीत बळीराजासह देशवासीयांना सुखावणारी बातमी आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत अल निनोचीही स्थिती नसेल. त्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या पावसाच्या स्थितीचा अंदाज वर्तवला. 2025 मध्ये 105 टक्के म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो, असे मोहापात्रा म्हणाले. 4 महिन्यांच्या मान्सून हंगामासाठी एकूण पाऊस सरासरी 868.6 मिमी म्हणजेच 86.86 सेमी असायला हवा. त्याहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तीन महिने पाणीटंचाई

एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटांचे दिवस अधिक असतील. त्यामुळे पाण्याची प्रचंड कमतरता भासणार असून पॉवर ग्रिडवर दबाव वाढेल, असा इशाराही मोहापात्रा यांनी दिला. मात्र, यंदा अल निनोची स्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल आणि जून ते सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची कमतरता भरून निघेल असा अंदाज आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात धोधो पाऊस

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता आहे. विदर्भालगतचे जिल्हे वगळता मराठवाडय़ातील बहुतांश जिह्यांमध्ये आणि खान्देशातील काही भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.

अल निनोची स्थिती म्हणजे काय?

समुद्राचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढते. त्याचा परिणाम पावसाच्या सरासरीवर दिसतो. ज्या भागात चांगला पाऊस होतो तिथे पावसाचे प्रमाण कमी होते, तर कमी पाऊस असलेल्या अधिक पाऊस पडतो. अल निनोसारख्या परिस्थितीमुळे मान्सून अनेकदा कमकुवत होतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.