देशातील खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या 13 आणि 14 डिसेंबर असे दोन दिवस आकाशात उल्का वर्षाव पाहायला मिळणार आहे. निरभ्र रात्री आकाशात अचानक एखादी प्रकाश रेषा क्षणात चमकून जाते, त्याला उल्का वर्षाव म्हणतात. आकाशातील या मनमोहक घटनेचा आनंद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. वर्षभरात अनेक खगोलीय घटना अनुभवता आल्या असून यात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यांचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरमध्ये नागरिकांना उल्का वर्षाव पाहण्याचे भाग्य मिळणार आहे. 13 आणि 14 डिसेंबरच्या रात्री फेथेन लघुग्रहाचे वस्तू कण उल्कांच्या रूपात पडताना दिसणार आहेत. हे ताशी 120 या प्रमाणात पडतील. हे दृश्य पाहायचे असेल तर त्यासाठी गडद अंधाराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. रात्री 9 नंतर भल्या पहाटेपर्यंत हे पाहता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले. या दोन्ही दिवशी पहाटे अंतराळ संशोधन केंद्र अर्थात फिरत्या चांदणीचा आकाश नजारा 13 डिसेंबरला 6.09 ते 6.15 या वेळेत पश्चिम ते उत्तर बाजूस, तर 14 डिसेंबरला पहाटे 5.24 ते 5.26 या वेळेत उत्तर आकाशात पाहता येईल, असेही दोड म्हणाले.
उल्का वर्षाव म्हणजे काय?
अंधाऱ्या रात्री आकाशात लाल, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या रंगात चमकणाऱ्या रेषा क्षणार्धात चमकून जाताना दिसते, याला ‘तारा तुटला’ असे म्हटले जाते. परंतु तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलीय घटना असून यालाच ‘उल्का वर्षाव’ म्हटले जाते.