मेटान्यूमो व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, नागपुरात आढळले दोन रुग्ण

ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या विषाणूने चीन आणि मलेशियातील उद्रेकानंतर हिंदुस्थानात शिरकाव केला. कर्नाटक, तामीळनाडू आणि गुजरातनंतर या विषाणूने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून नागपुरात आज दोन मुले या विषाणूने बाधित झाल्याचे आढळले. या दोन मुलांसह देशातील ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला मेटान्यूमो व्हायरस या विषाणूची लागण झाली होती. 3 जानेवारीलाच याचे निदान झाले. त्यानंतर दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्येही सामान्य लक्षणे दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणे नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. दरम्यान, खासगी पऱयोगशाळेत या रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असला तरी या रुग्णांचे नमुने पुढील तपासणीसाठी नागपूरच्या एम्स आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत.

राज्यांना सर्व तयारीनीशी सज्ज राहण्याच्या सूचना

केंद्र सरकारने सर्व राज्यांना श्वसनाशी संबंधित आजारांवरील उपचाराच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या यंत्रणेसह सज्ज राहण्यास सांगितले आहे. मेटान्यूमो व्हायरसचा आणखी वेगाने फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांना कशाप्रकारे काळजी घ्यावी, सर्दी, खोकला तसेच श्वसनाशी संबंधित आजार बळावल्यानंतर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याच्या तसेच जनजागृती करण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीया श्रीवास्तव यांनी विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींची व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत या विषाणूशी संबंधित विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला तज्ञ मंडळी उपस्थित होती.

विषाणूचा धोका कमी, पण काळजी घ्या, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळू लागल्याने राज्य सरकार आज अधिक दक्ष झाले. या विषाणूचा धोका कमी असला तरी नागरिकांना योग्य औषधोपचार वेळेत मिळावेत याची जबाबदारी सरकारची आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तंतोतंत पालन करेल असे आज सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या विषाणूचा कोरोनाशी काहीच संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन या विषाणूबद्दल माहिती दिली. कोरोना परिस्थितीचा आपण चांगल्या पद्धतीने सामना केला होता. एचएमपीव्हीची लागण झालेले रुग्ण बंगळुरू, तामीळनाडू आणि नागपूर येथे आढळल्याने सरकार अॅलर्ट झाले आहे. पण हे रुग्ण चीनमध्ये गेले नव्हते, म्हणजेच हा विषाणू पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्याचा धोका फार कमी आहे, असे आबिटकर यावेळी म्हणाले.

कोरोना काळात केवळ भीतीमुळे अनेकांनी प्राण गमावले होते. यावेळी घाबरण्याची गरज नाही. पण लहान बाळं आणि वयोवृद्ध व्यक्तींबरोबर आधीच आजार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यायला हवी, असे आबिटकर म्हणाले. कोरोनाप्रमाणे मास्क वापरण्याची सध्या तरी गरज नाही; पण कोरोनामध्ये आपण जी स्वच्छतेची काळजी घेतली ती यावेळीही घ्या, असे याप्रसंगी हसन मुश्रीफ म्हणाले.

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी!

लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच ज्यांना जुने आजार आहेत अशा लोकांनी विशेषतः काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज या विषाणूप्रकरणी बैठक घेतली. राज्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

विषाणू 2001 पासून हिंदुस्थानात अस्तित्वात

हिंदुस्थानात हा विषाणू 2001 पासून अस्तित्वात आहे. तेव्हापासून या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होतात ते याच विषाणूमुळे. हा विषाणू कोरोनाप्रमाणे जिवघेणा नाही, असे एम्स नागपूरचे संचालक प्रशांत जोशी यांनी सांगितले.

चीनमध्ये थैमान सुरूच; वुहानमध्ये शाळा बंद

चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून 10 दिवसांत रुग्णांच्या संख्येत 529 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वुहानमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून चीनकडून तातडीने विषाणूसंदर्भात अहवाल मागवला आहे.