फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने चीनबाबत मोठा दावा केला आहे. चीन जगभरात शिखांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याचे फेसबुकच्या अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चीन शिखांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा आणि अपप्रचार करत आहे. या प्रचारात चीनने हिंदुस्थान, अमेरिका, कॅनडासह जगभरातील शीख समुदायाच्या लोकांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीन फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये द्वेषयुक्त अकाउंट चालवत आहे. ज्याद्वारे तो शिखांना भडकवण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये पंजाबसह जगभरातील शीख समुदाय, खलिस्तान स्वातंत्र्य चळवळ, कॅनडातील खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांची हत्या आणि भारत सरकारवर टीका आदींशी संबंधित पोस्टचा समावेश होता.
फेसबुकने या चिनी अकाउंटवर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरून चीनमधून चालणारी अशी 37 अकाउंट आणि 13 पेजेस काढून टाकण्यात आली आहेत. दरम्यान आतापर्यंत पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स अशा प्रकारे शिखांना लक्ष्य करून भारताविरोधात मोहीम चालवत होते. आता चीनकडून हा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. चीन आणि पाकिस्तानचे हे संयुक्त ऑपरेशन देखील असू शकते, अशी शक्यता आता हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे.