मार्क झुकरबर्ग ट्रम्प यांना देणार 217 कोटी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मेटा कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग हे 25 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 217 कोटी रुपये नुकसानभरपाई देणार आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी यूएस संसदेच्या कॅपिटल हिलमध्ये झालेल्या दंगलीनंतर मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट हटवले होते. त्यावेळी ट्रम्प हे अध्यक्षपदावर होते. मेटा यांच्या या निर्णयाबाबत ट्रम्प यांनी मेटाविरोधात खटला दाखल केला होता. परंतु, ट्रम्प हे आता पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग यांना हे प्रकरण लावून धरायचे नाही, उलट ते न्यायालयाबाहेर सोडवायचे आहे. त्यामुळे ट्रम्प यांना 217 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देऊन या वादावर पडदा टाकण्यासाठी झुकरबर्ग यांनी पुढाकार घेतला आहे. नुकसानभरपाईपैकी 22 दक्षलक्ष म्हणजेच 190 कोटी रुपये हे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय लायब्ररीसाठी वापरले जातील, तर उर्वरित रक्कम ही कायदेशीर शुल्क आणि अन्य गोष्टींसाठी खर्च केली जाणार आहे. ट्रम्प आणि झुकेरबर्ग अनेक वर्षांपासून एकमेकांचे विरोधक आहेत. 2017 मध्ये ट्रम्प यांनी मार्क झुकरबर्गच्या फेसबुक प्लॅटफॉर्मला ‘ट्रम्पविरोधी’ म्हटले होते. चार वर्षांनंतर अकाउंट डिलीट केल्यानंतर ट्रम्प आणि झुकेरबर्ग यांच्यातील संबंध आणखी बिघडले. ट्रम्प यांनी मार्च 2024 मध्ये झुकेरबर्गवर राग व्यक्त केला होता आणि फेसबुकला ‘लोकांचा शत्रू’ म्हटले होते.

मेटाने अकाउंट परत केले

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यापूर्वीच मेटाने त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट त्यांना परत केले. मेटाने ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 8.6 कोटी रुपये दान केले. तसेच ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ाला मार्क झुकेरबर्गनेही हजेरी लावली होती. झुकेरबर्गने गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीत अमेरिकन टेक कंपन्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि ‘अमेरिकन मूल्यांचे’ संरक्षण केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाचे काwतुक केले होते.