उत्तम पगार, कर सवलत यांसारख्या आर्थिक लाभदायी गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मर्चंट नेव्हीचे करीअर नेहमीच खुणावत असते. मात्र देशातील मेरीटाईम रिक्रुटमेंट कंपन्यांना नेहमीच प्रशिक्षित आणि अनुभवी सीफेरर्सच हवे असतात. त्यामुळे देशातील विशेष करून महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी (ट्रेनी), एण्ट्री लेव्हलच्या सीफेरर्सना नोकरी मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एण्ट्री लेव्हलच्या हिंदुस्थानी सीफेरर्सना कार्गो शिपवर ट्रेनी म्हणून शिकाऊ प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे. जगभरातील विविध कार्गो शिपवर दरवर्षी सुमारे 5 हजार ते 5 हजार 500 एण्ट्री लेव्हलच्या हिंदुस्थानी सीफेरर्सना नोकरी मिळते, मात्र प्रत्यक्षात अशा ऑन-बोर्ड प्रशिक्षणाची गरज असलेल्या हिंदुस्थानी सीफेरर्सची संख्या चक्क दुप्पट आहे. थोडक्यात, दरवर्षी जवळपास दहा हजार एण्ट्री लेव्हलच्या हिंदुस्थानी सीफेरर्सना कार्गो शिपवर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून नोकरी मिळणे गरजेचे आहे.
अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंट इंडिया ही हाँगकाँग येथे मुख्यालय असलेल्या अँग्लो ईस्टर्न ग्रुपची मुंबईस्थित उपपंपनी आहे. कंपनीचे संचालक विनीत गुप्ता म्हणाले, ‘जगभरातील कार्गो शिपवर एण्ट्री लेव्हल शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून मर्यादित संधी उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्हे आणि शहरांतील ज्युनिअर सीफेरर्सना नोकरी मिळवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही.’
अँग्लो ईस्टर्न ग्रुपची मुंबईनजीकच्या कर्जत येथील अँग्लो ईस्टर्न मेरीटाईम अॅकॅडमी तिच्या सर्व नाविक विद्यार्थ्यांना- पॅडेट्सना कार्गो शिपवर एण्ट्री लेव्हल शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीची हमी देते.
दरवर्षी या अॅकॅडमीतील सुमारे 400 कॅडेट्सना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळते. त्यांना प्रत्येकी 500 अमेरिकन डॉलर्स इतके करमुक्त मासिक वेतन मिळते.