पोलिसांकडून सातत्याने कारवाया करण्यात येत असल्या तरी शहरात अमली पदार्थ तस्कर सुसाट असल्याचे चित्र आहे. विशेषतः मॅफेड्रॉन आणि गांजा व्यापार जोरात सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या मागील काही कारवाईतून हे अधोरेखित झाले असून मागील दहा ते पंधरा दिवसांत पोलिसांनी शहरातील विविध भागात केलेल्या कारवाईतून मॅफेड्रॉन, गांजासह जवळपास सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुरुवातीला मित्रमंडळीसोबत केवळ हौस म्हणून एखाद्या अमली पदार्थाचे सेवन कालांतराने व्यसनात रूपांतरित होण्याचे प्रमाण वाढत आहे. यातूनच शहरातील आजची तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यातही मॅफेड्रॉन, गांजा, ब्राऊन शुगर, हेरॉईन अशा अमली पदार्थांमुळे अनेक युवकांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे शहरात विविध भागात सहजरीत्या गांजा उपलब्ध होत आहे. मागील काही दिवसांत पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनेक भागातून गांजा विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून शेकडो किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात सर्रास गांजा उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत असून काही भागात टपऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी गांजा विकला जात असल्याचे चित्र आहे. नुकतेच कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगर, लोणी काळभोर, लोहगाव भागात कारवाई करून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एक कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या आठवड्यात कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर भागात केलेल्या कारवाईत पोलिसांनी ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यात ४० किलो गांजा, कोकेनचा समावेश आहे, तर काही दिवसांपूर्वी येरवडा येथे केलेल्या कारवाईत २३ लाखांचे एमडी पकडण्यात आले, तर काल लोहगाव आणि विमाननगर भागात केलेल्या कारवाईत २५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे सातत्याने कारवाया होत असल्या तरी अमली पदार्थ तस्करांचे रॅकेट सुरूच असल्याचे स्पष्ट होते.
साखळी तोडण्याची गरज गांजा, मॅफेड्रॉन (एम.डी.), कोकेन या अमलीपदार्थांच्या तस्करीसह नशा आणणाऱ्या औषधांची शहरात बेकायदा विक्री होत असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. तरुण मुला-मुलींना याचा सर्वात जास्त धोका आहे. आजवर वेळोवेळी कारवाया करून अनेकांना तात्पुरती अटक करण्यात आली. मात्र, ही साखळी तुटल्यास त्याचा मोठा फायदा होईल. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.