
अंमली पदार्थ विरोधात जिल्ह्यात धडक मोहिम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे मेफेड्रोन सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 9 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना चिपळूण तालुक्यातील खेडी एमआयडीसी येथे स्वीफ्ट या चारचाकी वाहनामध्ये एका व्यक्तीच्या संशयीत हालचाली आढळून आल्या. त्यावेळी त्याची चौकशी केली असता आरोपीकडे एक पिशवी आढळली. त्या पिशवीमध्ये 9 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन सदृश्य अंमली पदार्थ सापडला. संशयित आरोपीचे नाव दीपक रंगलाल लीलारे, असून तो काविळतळी चिपळूण येथे राहणारा आहे. पोलिसांनी स्वीफ्टकार आणि अंमली पदार्थ असा मिळून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विलास जाधव, उपनिरिक्षक हर्षद हिंगे, बाळू पालकर, विक्रम पाटील, प्रवीण खांबे, गणेश सावंत, वृक्षाल शेटकर, निलेश शेलार, अतुल कांबळे यांनी केली.