
देशभरामध्ये रविवारी श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या उत्साहाच्या वातावरणावर विरजण घालण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाल्याचे दिसून आले.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे रामनवमीला निघालेल्या मिरवणुकीवेळी काही तरुणांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत सहभागी झालेले काही तरुण दर्ग्यावर चढले आणि भगवे झेंडे फडकावत घोषणाबाजी करू लागले. यामुळे प्रयागराजमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी धाव घेतल्यानंतर सदर तरुणांनी पळ काढला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील गंगानगर भागातील सिकंदरा येथे परिसरात असणाऱ्या सालार मसूज गाझी मियां दर्ग्यावर चढून काही तरुणांनी गोंधळ घातला. रामनवमीनिमित्त रविवारी दुपारी निघालेल्या मिरवणुकीवेळी दुचाकीवर आलेले काही तरुण अचानक दर्ग्यावर चढले आणि भगवे झेंडे फडकावून घोषणाबाजी करू लागले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, मात्र तत्पूर्वीच तरुणांनी तिथून पळ काढला होता.
क्या इसको करने की सही में कोई आवश्यकता है?
यूपी के प्रयागराज में दरगाह पर चढ़कर भगवा झंडे लहराए गए I ये दरगाह गाजी मियां की है I pic.twitter.com/wkCnbqsuQk
— Prabhat Singh (@PrabhatSinghX) April 6, 2025
दरम्यान, गंगापूरचे पोलीस उपायुक्त कुलदीप सिंह गुणवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी दर्ग्यावरून चढून घोषणाबाजी केल्याचे समजताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जात आहे.
घटनास्थळी शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखली जात असून निष्काळजीपणआ करणाऱ्या पोलिसांवर विभागीय कारवाई केली जात आहे. सामाजिक शांतता भंग करणाऱ्या तरुणांवरही कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले. तसेच गाझी मिया दर्ग्यामध्ये पाच मजार असून तिथे हिंदू, मुस्लिम श्रद्धाळूही चादर अर्पण करण्यासाठी येतात, असेही त्यांनी सांगितले.