
मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई वांशिक गटातील वाद आणि हिंसाचारामुळे राज्यात प्रचंड अशांतता आहे. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच एक दिलासा दायक वृत्त येत आहे. गुरुवारी जिरिबाम जिल्ह्यातील कुकी आणि मैतेई यांच्यात शांतता करार झाला आहे. अर्थात हा करार एका जिल्ह्या पुरता आहे.
जिरिबामपुरते मर्यादित असले तरी, प्रशासकीय सूत्रांनी सांगितले मणिपूरच्या खोऱ्यात आणि डोंगराळ भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना एक प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मंजूर केलेल्या ठरावांमध्ये म्हटले आहे की ‘दोन्ही बाजूंना शांत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील’.
‘आता एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी करारावर स्वाक्षरी करणे हे दोन समुदायांमधील सुरू असलेल्या संघर्षाचे निराकरण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे’, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मैतेई, कुकी गट 15 ऑगस्टनंतर पुन्हा भेटणार आहेत.
करारात म्हटले आहे की दोन्ही बाजू जिरिबाममध्ये कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा दलांना सहकार्य करतील. 15 ऑगस्टनंतर दोन्ही पक्षांची पुन्हा भेट होईल, असा निर्णय बैठकीत झाला.
काही तासांपूर्वी, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माहिती दिली की सरकार शांतता चर्चेसाठी प्रयत्न करत आहेत.
गेल्या महिन्यात, जिरिबाम जिल्ह्यात राज्य पोलिसांसह संयुक्त गस्ती दलावर जमावाने हल्ला केल्याने एक CRPF जवान शहीद झाला आणि इतर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.