![Mehul Choksi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/Mehul-Choksi-696x447.jpg)
पंजाब अँड नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत परागंधा झालेल्या मेहुल चोक्सीशी संबंधित गीतांजली जेम्स लिमिटेडच्या मालमत्तेचे मूल्यांकन व लिलाव करण्यास विशेष सत्र न्यायालयाने परवानगी दिली. सांताक्रुझमधील सात फ्लॅट्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक व्यावसायिक युनिट व कार्यालय तसेच सुरतमधील एका दुकानाचा यात समावेश आहे.
पीएनबी बँकेची सुमारे 13 हजार 400 कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीविरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. इतरही तपास यंत्रणांनी चोक्सीला समन्स बजावले आहेत. मात्र चोक्सी हिंदुस्थानात परतण्यास तयार नसल्याने 2018 साली त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयाने लिक्विडेटर्सना गीतांजली जेम्स लिमिटेडच्या सुरक्षित मालमत्तेचे मूल्यांकन करण्याची परवानगी दिली. त्यानंतर लिक्विडेटरने असुरक्षित मालमत्तांचे मूल्यांकन आणि लिलाव करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. ईडीच्या वकील कविता पाटील यांनी या याचिकेवर एजन्सीला कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले. याचिकेवर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांच्यासमोर सुनावणी सुरू असून न्यायालयाने मालमत्तेचे मूल्यांकन आणि लिलाव करण्यास लिक्विडेटरला परवानगी दिली.