समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव नाही. आता मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळील समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक जण ठार झाला, तर एक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोणगाव जवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर बाजूला पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी नागपूरकडे निघालेला ट्रक क्र. MH 32 AJ 4666 हा रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. रात्री एक ते दीडच्या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र. MH 29 TO770) त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कलीम सय्यद सलीम (वय – 24) हा ठार झाला तर मिर्झा कुदरत बेग (वय – 31, दोघे रा. दारव्हा, जि. यवतमाळ) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर मेहकर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले
दरम्यान, अपघात घडताच मदत पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. याच ठिकाणी जवळच 5 जूनला पहाटेच्या सुमारास छत्तीसगडवरून पुण्याला जाणाऱ्या लक्झरी बसला अपघात झाला होता. चालकास डुलकी लागल्याने बस पलटी होऊन दोन जण जखमी झाले होते. आजच्या अपघाताचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.