मेहिदीच्या संघर्षामुळे कसोटी नाट्यमय वळणावर, 6 बाद 112 वरून बांगलादेश 7 बाद 283

मंगळवारच्या 3 बाद 101 वरून डाव सुरू करणाऱया बांगलादेशची दक्षिण आफ्रिकन माऱयापुढे 6 बाद 112 अशी घसरगुंडी उडाल्यावर त्यांचा डावाचा पराभव डोळय़ांसमोर दिसत होता. तेव्हा मेहिदी हसन मिराजने पदार्पणवीर जाकेर अलीच्या साथीने 138 धावांची झुंजार भागी रचत बांगलादेशला डावाने पराभवाच्या संकटातून दूर काढले आणि कसोटीही नाटय़मय वळणावर नेली. आता बांगलादेशकडे दुसऱया डावात 81 धावांची आघाडी असून मेहिदी 87 तर नईम हसन 16 धावांवर खेळत होते.

पहिल्या डावात 202 धावांची प्रचंड आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेने कसोटीवर आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली होती. त्यातच मंगळवारी बांगलादेशची 3 बाद 101 अशी अवस्था झाल्यामुळे आफ्रिकन गोलंदाज यजमानांचा डाव तिसऱयाच दिवशी संपवून पहिली कसोटी आपल्या खिशात घालतील, अशी अपेक्षा होती. आफ्रिकेने आज दिवसाची सुरुवातही भन्नाट केली. अवघ्या 8 धावांत तीन फलंदाज बाद करत बांगलादेशचे पराभवाचे संकट आणखी गहिरे केले. डावाचा पराभव टाळण्यासाठी बांगलादेशला 90 धावांची गरज होती.

मेहिदी हसन आणि जाकेरची संघर्षपूर्ण भागीदारी

बांगलादेशचा डावाचा पराभव जवळजवळ निश्चित होता. दिवसाच्या प्रारंभीच 3 हादरे देत दक्षिण आफ्रिकेने कसोटीवरील आपली पकड आणखी घट्ट केली होती. तेव्हा सातव्या आणि आठव्या क्रमांकावर खेळत असलेल्या मेहिदी आणि जाकेरने आफ्रिकन गोलंदाजांना रोखत केवळ धावाच केल्या नाही तर संघाचा डावाचा पराभवही दूर केली. ही जोडी पह्डण्यासाठी आफ्रिकन गोलंदाजांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न या दोघांनी हाणून पाडले. अखेर तब्बल 40 षटके किल्ला लढवल्यानंतर केशव महाराजने जाकेर अलीला पायचीत करीत ही जोडी पह्डण्यात यश मिळवले. जाकेरने आपल्या पदार्पणातच 58 धावांची झुंजार खेळी केली.

आता कसोटी जिंकण्याचे प्रयत्न

गेल्या आठवडयात हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटीप्रमाणे मिरपूर कसोटीही नाटय़मय वळणावर पोहोचली आहे. पहिल्या डावात 202 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशने आपली ही पिछाडी भरून काढत 81 धावांची आघाडीही घेतली आहे. ही आघाडी 150-200 धावांपर्यंत नेत दक्षिण आफ्रिकेवर दबाव आणण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. हे सर्व मिराजच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. 87 धावांवर खेळत असणारा मिराज चौथ्या दिवशी आपले दुसरे कसोटी शतक झळकावत संघाची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. दुसरीकडे बांगलादेशचा डाव लवकर गुंडाळून कसोटीवर आपली पकड कायम ठेवण्याचे आफ्रिकेचे प्रयत्न असतील. अधूनमधून येणाऱया पावसामुळे या मैदानावर 150 धावांचे आव्हानही आफ्रिकन फलंदाजांना महागात पडू शकते.