परीक्षण – लोकपरंपरेचे सौंदर्य आणि सामर्थ्य

>> मेघना साने

भारतातील लोककलावंत स्त्रियांच्या जीवन संघर्षांवर आणि त्यांच्या कला संप्रदायांवर प्रकाशझोत टाकणारी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची लेखमाला गेली काही वर्षे ‘सांस्कृतिक दिवाळी कालनिर्णय’मध्ये सुरू होती. ते अभ्यासपूर्ण लेख ‘लोकरंगनायिका’ या शीर्षकाखाली ‘पद्मगंधा प्रकाशन’ने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहेत. डॉ. अरुणा ढेरे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘लोककलावतींची चरित्रे म्हणजे एकाच वेळी थक्क करणाऱया आणि अस्वस्थ करणाऱया अद्भुत गाथा आहेत. त्या एकाच वेळी लोकपरंपरेचे सौंदर्य आणि सामर्थ्य दाखवतात व बाईपणाचे भोगही दाखवतात.’

डॉ. प्रकाश खांडगे यांनी पीएच.डी.च्या प्रबंधासाठी ‘खंडोबाचे जागरण एक विधिनाटय़ः इतिहास, वाङ्मय, प्रयोग’ हा विषय निवडला होता. हे संशोधन प्रामुख्याने क्षेत्रीय संशोधन होते. लोककलांचे सादरीकरण त्या त्या गावात जाऊन तर त्यांनी पाहिलेच, पण डॉ. प्रकाश खांडगे आणि शैला खांडगे यांनी अनेक लोककला महोत्सव मुंबईच्या रंगमंदिरांत आयोजित केले होते. तेव्हा निरनिराळ्या लोककलावतींच्या भेटी झाल्याने त्यांचा संघर्षही त्यांना समजून घेता आला. गेली पंचवीस वर्षे डॉ. खांडगे यांचे हे कार्य सुरूच होते. महाराष्ट्रातील या कलावती आणि इतर राज्यांतील काही पद्मश्रीप्राप्त लोककलावतींची चरित्रे त्यांनी या पुस्तकात लिहिली आहेत.

या पुस्तकात वर्णन केलेल्या लोकरंगनायिकांचा संघर्ष अगदी टोकाचा आहे. बहुतेकींना स्वतच्या कलेसाठी स्वतच्या कुटुंबापासून संघर्षाला सुरुवात करावी लागली. कलेच्या सादरीकरणाच्या वेडापायी घर सोडावे लागले, कुणाला संसार सोडावा लागला, पण आपल्या कलेवर विश्वास ठेवून या भक्कमपणे मृत्यूशीदेखील दोन हात करत उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर परिश्रमाने त्यांनी भारतात कीर्ती मिळवली. म्हणून त्या आज नायिका ठरल्या आहेत.

पंडवानी गायिका तीजनबाई ही नवऱयाने पंडवानीला विरोध केल्याने ती तीन मुलांना घेऊन रस्त्यावर आली, पण आपले कौशल्य विकसित करून तिने भारतभर सादरीकरण केले. तिला सरकारकडून पद्मभूषण किताब मिळाला. गुजरातच्या कच्छच्या रणातील लोकगायिका आणि नायिका धनाबाई कारा यांना त्यांचे गुण पाहून सुविख्यात शहनाई वादक सुलेमान आकाशवाणी केंद्रावर घेऊन जाणार होते. तेव्हा या कुटुंबाकडे तिकिटाच्या खर्चाला पैसे नव्हते. अखेर घरची भांडी विकून आलेल्या पैशांतून त्यांनी प्रवासखर्च भागवला. पुढे याच मुलीने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला. पश्चिम बंगालमधील बाउलगान परंपरेतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पार्वती बाउल यांचा जन्म खरे तर उच्चभ्रू व सुखवस्तू कुटुंबात झाला, परंतु बाउल गायनाचा ध्यास घेऊन त्या गुरूच्या आश्रमात राहिल्या. त्यांच्याबरोबर सात वर्षे विविध ठिकाणी भ्रमण केले. विविध देशांतून विविध कलांचे ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या बाउलगान परंपरेची प्रतिष्ठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवली. ज्या काळात उत्तर प्रदेशातील नौटंकी या कला प्रकारात स्त्रिया काम करत नव्हत्या, त्या काळात अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या गुलाबोने आव्हान स्वीकारले आणि समाजाचा विरोध पत्करूनही सादरीकरण केले. ‘द ग्रेट गुलाब थिएट्रिकल कंपनी’ अशी स्वतची नौटंकी कंपनी स्थापन केली. 1990 मध्ये गुलाबबाईंना पद्मश्री मिळाला.

देवदासी परंपरेचा मानदंड समजल्या जाणाऱया मंजम्मा यांची तर कहाणीच वेगळी. तिचे खरे नाव मंजुनाथ शेट्टी. तिचा संघर्ष स्वतच्या शरीरापासून सुरू झाला. मंजुनाथ शेट्टीला लहानपणीच आपल्यातील स्त्राr जाणवली. कुटुंबाचा विरोध पत्करत मंजुनाथ असण्याचे ओझे अव्हेरून त्या मंजम्मा बनल्या. कमालीचे दारिद्रय़, समाजाकडून व कुटुंबाकडून उपेक्षा, लैंगिक शोषण, अवहेलना झेलत राखेतून भरारी घेणाऱया फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्या उभ्या राहिल्या. जोगती झाल्या. नाटय़ अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्धी मिळवली. त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. सरकारकडून आलेल्या फोनला ‘राँग नंबर’ असं उत्तर त्यांनी दिले होते.

‘लावणी शृंगाराची खाण’ म्हणून वाखाणल्या गेलेल्या वाईच्या यमुनाबाई वाईकर या कोल्हाटी समाजाच्या, पण त्यांनी लावणीला घरंदाज शृंगारिक साज चढवला. ‘अस्तमान दोन घटका’ ही लावणी सादर करताना त्या पतंगाचा खेळ दाखवीत, तर ‘ऐकावी बडोद्याची कहाणी’ ही लावणी सादर करताना तलवार, दांडपट्टा खेळत असल्याचा अभिनय अंतर्भूत करीत. आपल्या माळी, कोल्हाटी समाजातील कलावंतांना त्यांनी नशामुक्त केले. त्यासाठी मंदिर उभारले. यमुनाबाईंना ‘संगीत नाटक अकादमी’ तसेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. पंढरपूरच्या विठाबाई नारायणगावकर यांची नृत्यावरील श्रद्धा सर्वश्रुत आहे. चित्रपटांमध्येही त्यांनी नृत्य केले आहे. 1996 साली दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ‘फड सांभाळ तुऱयाला आला’ ही लावणी ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाली अशा लावणी गायनाच्या क्षेत्रातील अनभिषिक्त गानसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांना तर महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

सपेरा समाजातील गुलाबो सपेरा यांच्या जमातीत अनेक अंधश्रद्धा व वाईट परंपरा होत्या. त्या सगळ्याशी झुंज देत आपल्या मनमोहक कालबेलिया नृत्याने गुलाबो सपेराने दुनियाभरच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या या अभिनेत्रीला, नृत्यांगनेला आपल्या जातीच्या परंपरा व नियमांनी खूप त्रास भोगावा लागला तरी आपल्या समाजातील मुलींची प्रगती कशी घडून येईल यावर तिने लक्ष दिले. या सर्व लोक कलावतींनी केवळ नृत्य, गायनच नव्हे तर सामाजिक कार्यदेखील केले आहे व पुढील पिढीतील कलाकारही घडवले आहेत.

‘लोकरंगनायिका’ या पुस्तकात लोककलावतींची अशी चरित्रे सांगत असताना डॉ. प्रकाश खांडगे यांनी त्यांच्या लोककला व नृत्यप्रकारांचीही माहिती दिली आहे. बाउल गायन म्हणजे काय, त्याचा इतिहास किंवा सपेरा जमातीतील कालबेलिया नृत्य, त्याचा पोषाख, त्याला लागणारी वाद्ये यांचीही ओळख करून दिली आहे. एकूण या सर्व लेखनातून आपल्या मनाला भिडते ती जीवनाबद्दलची सकारात्मकता. मृत्यूपेक्षाही भयकंर गोष्टींना तोंड देऊन या लोकरंगनायिका ठाम उभ्या राहिल्या आणि त्यांना नावलौकिक मिळाला. लेखक डॉ. प्रकाश खांडगे यांना या सर्व कलावतींबद्दल अत्यंत आदर असलेला दिसून येतो. थोडय़ा अपयशाने वैफल्यग्रस्त होणाऱया हल्लीच्या विद्यार्थ्यांसमोर यांचे जीवन आदर्श म्हणून ठेवण्यासारखे आहे.

[email protected]