लक्षवेधी – सौदामिनींच्या स्वातंत्र्याचा इतिहास

>> मेघना साने

स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाल्याच्या निमित्ताने पद्मगंधा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा, विख्यात साहित्यिक शुभांगी भडभडे यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱया सौदामिनींची चरित्रे शोधून त्यावर नाटय़ संहिता लिहून घेतल्या. एकपात्री स्वरूपातील या संहितांमधून निवडक 25 संहिता दिग्दर्शिका प्रभा देऊसकर व सुनंदा साठे यांनी पंचवीस कलाकारांकडून बसवून घेतल्या. या पंचवीस कलाकारांच्या एकपात्री प्रयोगांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.

संपूर्ण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्य संग्राम किंवा स्वातंत्र्य चळवळी या विषयाला धरून ललित साहित्य फारच कमी प्रमाणात निर्माण झाले आहे. स्वातंत्र्य सेनानींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचनात येतात, पण स्वातंत्र्याचा इतिहास उलगडणारे ललित साहित्य फारसे आढळत नाही. खरं तर महात्मा गांधींनी ‘चले जाव’ चळवळ केली, दांडी यात्रा काढली, सत्याग्रह केले तेव्हा या चळवळींमध्ये सामील होण्यासाठी घराघरांतून फक्त पुरुषच नव्हे, तर हजारो महिला रस्त्यावर आल्या होत्या. मग यांनी कोणी कथाविषय कसे केले नाही? स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ाढांतिकारी स्त्रिया दुर्लक्षितच राहिल्या.

स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली तेव्हा पद्मगंधा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा, विख्यात साहित्यिक शुभांगी भडभडे यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱया, विजेसारख्या तळपणाऱया या सौदामिनींची चरित्रे जनतेसमोर यावीत म्हणून एक प्रकल्प राबवला. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन सशस्त्राढांती करणाऱ्या तसेच असहकार चळवळीत भाग घेणाऱया महिलांची चरित्रे शोधून त्यावर नाट्य संहिता लिहून घेण्याचे त्यांनी ठरविले. विविध लेखिकांकडून या संहिता लिहून घेऊन त्या एकपात्री स्वरूपात महिला कलाकारांकडून सादर करून घ्याव्यात अशी त्यांची संकल्पना होती. त्याप्रमाणे शुभांगीताईंनी संशोधन करून हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांतांतील या सौदामिनींचे कार्य शोधून काढले. त्यानंतर नागपुरातील पद्मगंधा प्रतिष्ठानच्या लेखिकांशी संपर्क करून प्रत्येक सौदामिनीसाठी नाटय़ संहिता लिहून घेतल्या. गेली चाळीस वर्षे नाट्य़ क्षेत्रात काम करणाऱया प्रभा देऊसकर यांनी शुभांगीताईंना उत्तम साथ दिली. अनेक लेखिकांनी लिहिलेल्या या संहितांचे एक पुस्तकच तयार झाले. ‘विजय प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी’ या पुस्तकात पन्नास क्रंतिकारी स्त्रियांचे चरित्र प्रकाशित झाले आहे.

या पुस्तकातील पंचवीस संहिता निवडून त्या पंचवीस कलाकारांकडून बसवून घेण्याचे काम कुशल दिग्दर्शिका प्रभा देऊसकर व सुनंदा साठे यांच्यावर सोपविण्यात आले. चाळीस वर्षे नाटय़ क्षेत्रात आपली कारकीर्द केलेल्या प्रभाताईंनी कलाकारांची निवड योग्य तऱहेने केली. विदर्भातील या महिला कलाकार आपल्या नोकऱया, व्यवसाय सांभाळून तालमीला हजर राहू लागल्या आणि दोन महिन्यांच्या तालमींनंतर एक सुंदर प्रयोग उभा राहिला. एकपात्रीच्या क्षेत्रात महिला हातावर मोजण्याइतक्या आहेत. त्यात स्वातंत्र्य संग्राम हा विषय घेऊन उभे केलेले हे नाटय़ विशेषच.

पद्मगंधा प्रतिष्ठानने पंचवीस कलाकारांचा हा प्रयोग एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या नोंदीसाठी जाहीर केला. यापूर्वीही विदर्भात एकूण पंच्याहत्तर दोन अंकी नाटके केवळ महिलांकडून लिहून घेतली. यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठानची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. आता हा एकपात्रीचा नवीन प्रकल्प नागपूरच्या एल. ए. डी. कॉलेजच्या भवानी शंकर नियोगी या भव्य हॉलमध्ये 27, 28 आणि 29 सप्टेंबरला सेट, लाईट, म्युझिक, कॉस्च्युम्ससकट सादर होणार होता. 27 तारखेला एशिया बुक ऑफ रेकार्ड्सचे परीक्षक डॉ. मनोज तत्वादी प्रयोग पाहण्यास उपस्थित झाले ते त्यांची कॅमेऱयाची टीम घेऊनच. तीनही दिवसांचे रेकॉर्डिंग एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी होणार होते. सादरीकरणापूर्वी उद्घाटन समारंभात ‘स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी हे पुस्तक संपादित करणाऱया शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार, शंकरराव जाधव, डॉ. मनोज तत्वादी, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रभा देऊसकर आणि एकपात्री कलाकार मेघना यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रकाशनानंतर एकपात्री सादरीकरण सुरू झाले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणारी राणी लक्ष्मीबाई, सशस्त्र ाढांतीत भाग घेणारी बीना रॉय, हिंदुस्थानचा झेंडा फडकवण्यासाठी जिने छातीवर गोळी झेलली ती कनकलता बरुआ, पारतंत्र्याच्या काळात गुप्त रेडिओद्वारे हिंदुस्थानीयांना ‘छोडो भारत’ आंदोलन छेडण्याचा संदेश देणारी उषा मेहता, नागभूमीतील तेजस्वी शलाका, जी पुढे पद्मभूषण किताबाने सन्मानित झाली, ती राणी गाईडिल्यू, जिने युद्धात औरंगजेबालाही नामोहरम केले ती कन्नड कन्या राणी चेन्नम्मा, जनतेचा छळ करणाऱया इंग्रज अधिकाऱयावर, मॅजिस्ट्रेट स्टीव्हनवर गोळ्या झाडणारी चौदा वर्षीय महिला सुनीती चौधरी, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी बाहत्तर वर्षीय महिला मातंगिनी हाजरा या साऱया सौदामिनी विविध वयाच्या, विविध राज्यांतल्या आणि विविध जातींच्या होत्या. सर्वांचे लक्ष्य एकच होते – हिंदुस्थानचे स्वातंत्र्य!

उत्तम सेट डिझाइन, उत्तम प्रकाश योजना, उत्तम पार्श्वसंगीत यांसह हा कार्पाम रंगमंचावर पाहताना अंगावर रोमांच येत होते, कधी डोळ्यांतून अश्रूसुद्धा. महिलांनी जीव तोडून केलेला अभिनय हा त्या त्या व्यक्तिमत्त्वात त्यांनी केलेला परकायाप्रवेश असल्याची ग्वाही देत होता. विजय देऊसकर यांनी डिझाईन केलेल्या रंगमंचावरील भव्य सेटमुळे तत्कालीन वातावरण निर्मिती झाली होती. लाठीमार, अश्रुधूर, गरोदर स्त्रियांच्या पोटावर लाथ मारणे, दोरखंडाने बांधणे असे अनन्वित अत्याचार असणारे प्रसंग या कलाकार महिलांनी जिवंत उभे केले.

एकूण पंचवीस महिलांचे सादरीकरण असलेला हा उपाम उत्तम रीतीने पार पडला. 29 तारखेला रात्री पद्मगंधा प्रतिष्ठानला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे सर्टिफिकेट देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. या उपामातील लेखिका, कलाकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञ हे सर्व नागपुरातीलच आहेत. मागील तीस वर्षांपासून कार्यरत असलेली ही साहित्यिक व सांस्कृतिक संस्था विविध कार्पामांचे आयोजन करीत आहे. त्यात दरवर्षी तीन दिवसीय ‘लेखिका नाटय़ महोत्सव’ करतात.