नाट्यरंग – दिव्यांग कला महोत्सव

>> मेघना साने

बालरंगभूमी परिषद, मुंबई यांनी बालरंगभूमीच्या विकासासाठी जिल्हानिहाय कार्यकारिणी मंडळे स्थापन केली आहेत. मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के व कार्यवाह सुप्रसिद्ध बालनाटय़ दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी मुलांच्या विकासासाठी या संस्थेचे उपाम आखले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने नुकतेच लोककला संमेलनाचे आयोजन केले होते.

लरंगभूमी परिषद, मुंबई यांनी बालरंगभूमीच्या विकासासाठी जिल्हानिहाय कार्यकारिणी मंडळे स्थापन केली आहेत. मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के व कार्यवाह बालनाटय़ दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी मुलांच्या विकासासाठी या संस्थेचे उपाम आखले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने नुकतेच लोककला संमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऑगस्ट महिन्यात पार पडले. ऑक्टोबर 2024 मध्ये सर्व शाखांनी आपापल्या शहरात दिव्यांग महोत्सव करावा अशी संकल्पना नीलम शिर्के यांनी मांडली आणि संमेलनाला नाव दिले ‘यहाँ के हम सिकंदर.’

त्यानुसार ठाणे येथे विशेष मुलांचे संमेलन दिनांक 13 ऑक्टोबर रोजी करण्याचे ठरले. ठाणे शाखेचे अध्यक्ष मा. मिलिंद बल्लाळ (‘ठाणे वैभव’चे संपादक) यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ठाण्यातील कार्यकारिणीतील सदस्यांनी काम करणे सुरू केले. मिलिंद बल्लाळ आणि कार्यवाह अमोल आपटे यांनी प्रत्येकाला या संमेलनाची वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली. त्यानुसार मी, सुचेता रेगे आणि नूतन बांदेकर यांनी विशेष मुलांच्या शाळांना संपर्क करण्याचे काम स्वीकारले. विशेष मुलांमध्ये मतिमंद, विकलांग, दृष्टिहीन, कर्णबधिर, मूकबधिर, स्वमग्न अशा सर्व प्रकारच्या मुलांच्या शाळा ठाणे आणि परिसरात होत्या अशी माहिती मिळाली. कधी नेटवरून, तर कधी ओळखीतून माहिती काढून ठाणे आणि परिसरातील 26 शाळांशी संपर्क केला.

या संमेलनात दिव्यांग मुलांना गायन, वादन, नृत्य इत्यादी कला रंगमंचावर सादर करता याव्यात यासाठी एक मोठा हॉल आम्ही उपलब्ध केला होता. तसेच काही संस्थांतील मुले उत्तम वस्तू तयार करतात. त्या वस्तू स्टॉलवर मांडून त्यांची पी करण्याची परवानगी होती. प्रगती अंध विद्यालय बदलापूर, जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची शाळा पालघर या शाळांमध्ये गायन व वादन कलांचे शिक्षण दिले जाते. तसेच आज तेथे 75 विद्यार्थी पहिली ते दहावी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एक विद्यार्थ्याने ‘टाय अँड डाय’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले. ठाण्यातील प्रसिद्ध ‘जिद्द’ शाळेत विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात. वैद्यकीय शिबिरे हा या शाळेचा अविभाज्य भाग आहे. ‘चैतन्य’ मतिमंद मुलांची शाळा ही मुलांची उद्योगशाळा आहे. येथे पदाधिकारी व कर्मचारी सर्व स्त्रियाच आहेत. या शाळेत थालीपीठ भाजणी, बेसन पीठ ते अगदी शिकेकाई पावडरपर्यंत उत्पादने तयार करायला दिव्यांग मुले झटत असतात. त्यांना कुवतीप्रमाणे स्टायपेंड दिला जातो. ‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ ही वाडा येथे बहुविकलांग मुलांची शाळा आहे. त्यांचे वसतिगृह तीळगा गावी आहे. येथेही मुलांना व्यवसाय शिक्षण मिळते. तीव्र व्यंग असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी पालकांना मदत व्हावी या हेतूने ही संस्था काम करते. ‘रेनबो फाऊंडेशन बदलापूर’ येथे मुलांच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली जाते. गेल्या वर्षी त्यांनी 35 विद्यार्थ्यांना ‘मेनस्ट्रीम स्कूलिंग प्रोग्रॅम’ (मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश) साठी तयार केले. तसेच कागदी लिफाफा बनविण्यापासून ड्रोन बनविण्यापर्यंत अनेक गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. मुलांना अर्थपूर्ण अनुभवांद्वारे सक्षम केले जाते. ‘कमलिनी कर्णबधिर विद्यालय ठाणे’ येथे कला व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थी विकास साधला जातो. ‘आस्था आरोग्य सेवा’ या संस्थेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी दिली जाते. तसेच हे निवासी अभ्यास केंद्रदेखील आहे. ‘विश्वास’ मतिमंद मुलांसाठी असलेल्या केंद्रात चित्रकला, नृत्यकला, नाटय़कला यांचे प्रशिक्षण दिले जाते. ’ण्प्ग्त्d aह् भ्दल्’ ही संस्था स्वमग्न तसेच विकलांग मुलांसाठी काम करते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा शोध घेऊन त्यांची प्रगती घडवून आणते. ‘संतोष इन्स्टिटय़ूट फॉर मेंटली चॅलेंज्ड’ या संस्थेची सुरुवात मुलांसाठी मैदानी खेळ आयोजित करून झाली. हळूहळू पालकांच्या गरजेनुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी त्यांनी शाखा निर्माण केल्या. सांपूझ, कांदिवली, मीरारोड, डोंबिवली, सीवूड, गोरेगाव, बेलापूर इत्यादी ठिकाणी यांच्या शाखा आहेत.

संमेलनाचा दिवस उजाडला. एकूण 26 शाळा /संस्थांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. दिव्यांग मुलांसमवेत पालक आणि शिक्षकांनी हॉल भरून गेला होता. बालरंगभूमी परिषदेतर्फे 18 वर्षांखालील मुलांनाच व्यासपीठ दिले जाणार होते. वयाने मोठय़ा अशा दिव्यांग मुलांनी बनविलेल्या विविध वस्तूंची पी व्हावी म्हणून हॉलबाहेरील व्हरांडय़ात स्टॉल्स मांडले होते. पणत्या, आकाशकंदील, फराळ, पिशव्या, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, भाजणीची पीठे, विविध प्रकारची अत्तरे अशा अनेक वस्तू तेथे मांडल्या होत्या. उपस्थितांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. वांगणीमधल्या व्यासपीठावरील सादरीकरणात ‘आत्मन अकॅडमी’ने एक सुंदर नाटक सादर केले. मग गायन, वादन, नृत्य अशी सादरीकरणे होत गेली. एका विद्यार्थ्याने ‘लुंगी डान्स’ करताना गोविंदाला फेल केले, तर एका अंध विद्यार्थिनीने ‘सांज ये गोकुळी’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. एका अंध विद्यार्थ्याने ट्रकवर गायलेले ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे तर वन्स मोअर घेऊन गेले. काही रसिक श्रोत्यांनी तिथल्या तिथे या मुलांना रोख बक्षिसे दिली.
13 ऑक्टोबरला जसे ठाण्यात संमेलन झाले तसे बीड येथे 5 ऑक्टोबरला, तर नंदुरबार येथे 8 ऑक्टोबरला, जळगाव येथे 9 ऑक्टोबरला, रत्नागिरी येथे 14 ऑक्टोबरला, सोलापूर येथे 15 ऑक्टोबरला, सांगली व कोल्हापूर येथे 16 ऑक्टोबरला, पुणे येथे 17 ऑक्टोबरला, कल्याण येथे 18 ऑक्टोबरला अशी संमेलने झाली व पुढील आठवडय़ात अकोला, परभणी, नाशिक, धुळे, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर येथे होणार आहेत.

[email protected]