उमेद – सामाजिक बांधिलकीची जाणीव

>> मेघना साने

प्रसार माध्यमांमध्ये समाज घडवण्याची ताकद आहे हे ओळखून सामुदायिक विचार व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून ‘रेडिओ विश्वास 90.8’ कम्युनिटी रेडिओची निर्मिती केली गेली. या माध्यमातून लोकांच्या सहभागातून विविध सामाजिक विषयांवर कार्यक्रम निर्मिती व प्रसारणाचे काम सुरू आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव बळकट करणाऱया ‘रेडिओ विश्वास’ची ही वाटचाल.

13 फेब्रुवारीची संध्याकाळ. जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यासाठी ‘रेडिओ विश्वास 90.8’ कम्युनिटी रेडिओकडून मिळालेल्या आमंत्रणावरून आम्ही ‘रेडिओ विश्वास’चे सर्व कलाकार नाशिकमधल्या प्रसिद्ध अशा विश्वास लॉन्सवर स्नेहमेळाव्यासाठी जमलो होतो. एरवी एकमेकांचा फक्त आवाजच ऐकणारे आम्ही मुलाखतकार, आर जे, एपिसोड रायटर, गायक एकमेकांना प्रत्यक्ष भेटत होतो. महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, धुळे अशा विविध शहरांमधून आणि खुद्द नाशिकमधून असे जवळ जवळ दोनशे-अडीचशे कलाकार, तंत्रज्ञ उत्सुकतेने येथे जमले होते. ‘रेडिओ विश्वास’चे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी यांनी कार्यक्रम अनौपचारिक असेल, गप्पांना प्राध्यान्य असेल असे सांगितलेच होते. ‘रेडिओ विश्वास’ची समन्वयक रुचिता ठाकूर ही सर्व व्यवस्था पाहत जबाबदारीने सर्वांचे स्वागत करीत होती. ‘रेडिओ विश्वास’चे सर्वेसर्वा व अत्यंत लोकप्रिय असे विश्वास ठाकूर, विश्वास ज्ञानप्रबोधिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी हे व्यासपीठावर उपस्थित होताच कार्यक्रम सुरू झाला.

कम्युनिटी रेडिओ म्हणजे लोकांनीच लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले रेडिओ केंद्र होय. भारतात असे साधारण पाचशेच्यावर कम्युनिटी रेडिओ आहेत. नाशिकमधील विश्वास ठाकूर यांनी आपल्या सहकाऱयांसह विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिटय़ूटची 31 मार्च 2000 रोजी स्थापना केली. ही संस्था ग्रामीण, आर्थिकदृष्टय़ा मागास, दुर्लक्षित घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी कार्यरत आहे. प्रसार माध्यमांमध्ये समाज घडवण्याची ताकद आहे हे ओळखून सामुदायिक विचार व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून ‘रेडिओ विश्वास 90.8’ कम्युनिटी रेडिओची निर्मिती केली गेली. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणाऱया एनजीओ, शैक्षणिक संस्था, शेतकी संस्था यांना कम्युनिटी रेडिओ स्थापन करण्याची परवानगी सरकारकडून मिळू शकते. आज ‘रेडिओ विश्वास 90.8’ कम्युनिटी रेडिओद्वारे विविध सामाजिक विषयांवर लोकांच्या सहभागातून कार्यक्रम निर्मिती व प्रसारणाचे काम सुरू आहे. ‘रेडिओ विश्वास’च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, शिक्षण, बालविवाह, कौशल्य विकास कार्यशाळा, आरोग्यविषयक शिबिरे आदी विषयांवर तळागाळापर्यंत जाऊन काम सुरू आहे.

‘मला आवडलेले पुस्तक’, ‘माझी कविता’, ‘आजचे पाहुणे’, ‘स्वरसंध्या’, ‘ओठावरली गाणी’ अशा कार्यक्रमांतून साहित्य, साहित्यिक व जगभरातील साहित्यिक घडामोडी याबद्दल श्रोत्यांना माहिती मिळत असते, तर इतर सामाजिक उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीची जाणीव बळकट होत असते.

हिंसा को नो

ग्रामीण परिसरातील अनेक स्त्रिया अजूनही कौटुंबिक हिंसेला बळी पडताना दिसतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही स्थलांतरित भारतीय कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसेच्या अनेक केसेस आढळून येतात. ‘रेडिओ विश्वास’ने स्थानिक परिसरातील जबाबदारी घेऊन कौटुंबिक हिंसेबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आखला. चार वसाहतींची निवड करीत, पंचवीस-तीस महिलांचा गट बनवून दर आठवडय़ाला त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती दिली जाते. तेथील महिलांना सरकारने त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, ‘वन स्टॉप सेंटर’, सुरक्षा अधिकारी, महिला सहायता कक्ष, आपत्कालीन नंबर 112 आदी सुविधा कशा काम करतात हे समजावून दिले. याशिवाय ‘विश्वास रेडिओ’वरून कीर्तन, भारूड, जोगवा या लोककलेवर आधारित कार्यक्रमांतून घरेलू हिंसेची माहिती दिली जाते. सदर कार्यक्रम वसाहतींमध्ये जाऊनदेखील महिलांना ऐकवले जातात.

प्राध्यान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला

बालविवाह प्रतिबंधक कायदा सरकारने 2007 पासून अमलात आणला आहेच. तरीही भारतात अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. बालविवाह हा स्त्राrच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे. कर्नाटक, तामीळनाडू व पश्चिम बंगाल येथे बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असले तरी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बालविवाहाची पद्धत सुरू असल्याचे दिसते. बालविवाहाच्या बाबतीत नाशिकचा महाराष्ट्रात बारावा नंबर लागतो. ‘रेडिओ विश्वास’ कम्युनिटी रेडिओने स्थानिक पातळीवर काम करून ‘प्राध्यान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला’ हा विचार रुजविण्याचे काम सुरू केले. या प्रकल्पात ‘मविम’च्या (महिला आर्थिक विकास महामंडळ) बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांना बालविवाहासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्यात येत आहे. सदर प्रकल्प नाशिक तालुक्यातील सहा गावांतील गावकऱयांबरोबर राबवित आहेत. यामध्ये सर्वांना चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 ची माहिती दिली जाते.

‘रेडिओ विश्वास’चे संस्थापक विश्वास ठाकूर यांनी ‘रेडिओ विश्वास’ला मिळालेल्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांची माहिती दिली. 2023 साली रेडिओला सस्टेनेबिलिटी श्रेणीत प्रथम राष्ट्रीय पुरस्कार व थीमॅटिक श्रेणीत दुसरा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविड काळात या रेडिओने केलेल्या ‘शिक्षण सर्वांसाठी’ या कार्यक्रमाचा विश्वास ठाकूर यांनी विशेष उल्लेख केला. तळागाळातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ‘रेडिओ विश्वास’ आणि प्राध्यापक प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व विषयांवर नाशिक जिह्यातील सुमारे दोनशे शिक्षकांनी संपूर्ण अभ्यासक्रम तासिकांद्वारे प्रसारित केला. त्याचा सुमारे पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्या वेळी इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन आदिवासी भागात साडेपाचशे रेडिओ सेट्सचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले.

‘जागतिक रेडिओ दिना’च्या निमित्ताने युनायटेड नेशन्सने ठरवलेली थीम पर्यावरणाच्या संदर्भात होती. म्हणून ‘रेडिओ विश्वास’ने एकविसावे शतक आणि हवामान बदल या विषयावर ऑडिओ निबंध स्पर्धा घेतली. विजेत्यांचे अभिनंदन करीत विश्वास ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले, “आजवर ‘रेडिओ विश्वास’चे सर्व कार्यक्रम आपण लोकांनी चालविले आहेत. त्यामुळे आजवर ‘रेडिओ विश्वास’ची जी प्रगती झालेली आहे त्याचे श्रेय मी आपणा सर्वांना देतो.’’

[email protected]