विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या, रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत स्लो ट्रकवरच्या ट्रेन बंद करण्यात आल्या असून या गाडय़ा फास्ट ट्रकवरूनच चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. काही अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाडय़ांचे डायव्हर्जन केले जाणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱया डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.