भाजपाध्यक्षपदासाठी दिल्लीत जोरबैठका, अमित शहा–राजनाथ यांच्यात बैठक

मुदत उलटून गेली तरी भारतीय जनता पार्टीला आपला नवा अध्यक्ष अजून मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व राष्ट्रीय स्वंयसेवक संघामध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्ष पदावरून मतैक्य होत नसल्यामुळे भाजपाध्यक्ष पदाची निवड लांबणीवर पडली आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना यापूर्वीच दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र मोदी व संघातील सत्तासंघर्षामुळे ही निवड लांबणीवर पडलेली असताना, काल अमित शहा व राजनाथ सिंह यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.

भाजपाध्यक्ष पदासाठी मोदी-शहा विरुद्ध संघ असा मुकाबला रंगला आहे. संघाकडून अध्यक्ष पदासाठी संजय जोशी, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह ही नावे सुचविण्यात आली आहेत, तर मोदी-शहा जोडीला आपल्या आवाक्यतला अध्यक्ष हवा आहे. त्यादृष्टीने मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांची नावे मोदी-शहा यांनी पुढे केली आहेत. पंतप्रधान पदावर आरूढ झाल्यानंतर तब्बल अकरा वर्षांनंतर नरेंद्र मोदींनी नागपुरात संघ मुख्यालयाचे दर्शन घेतले होते. त्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना चांगल्याच कानपिचक्याही दिल्या होत्या. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून या आठवडय़ाअखेरीस भाजपाला नवा अध्यक्ष मिळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्री अध्यक्षपदाच्या चर्चेत

केंद्रीय मंत्रिमंडळातील राजनाथ सिंह, शिवराजसिंह व मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांची नावे भाजपाच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान-राष्ट्रपती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. ही भेट तब्बल चाळीस मिनिटे चालल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान विदेश दौऱयावरून परतल्यानंतर किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर अवगत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेतात, असा आजवरचा राजकीय प्रघात आहे. मात्र असे कोणतेही ठोस कारण नसताना पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

योगींचा पत्ता कट, राजनाथ यांना संधी

भाजपमधील गुजराती लॉबीच्या मार्गात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोठा अडथळा बनले आहेत. योगींना येनकेनप्रकारेण यूपीतून हटविण्यसाठी मोदी-शहा कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून राजनाथ यांची भेट घेण्यासाठी अमित शाह काल त्यांच्या निवासस्थानी गेले. तिथे या दोघांमध्ये प्रदीर्घ भेट झाली. राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद देऊन त्यांच्या रिक्त जागेवर योगींना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन यूपीचे मुख्यमंत्री पद केशवप्रसाद मौर्या यांच्याकडे देण्याची मोदी-शहा जोडीची योजना आहे. त्या अनुषंगाने कालच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राजनाथ सिंह हे संघालाही चालणारे असल्याने त्यांच्या नावावर मतैक्य होईल, असे मानले जात आहे.