मिंधे – भाजपचा भ्रष्ट कारभार जाळून टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल पेटलीय, उद्धव ठाकरे कडाडले

”संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात मशाल धगधगत आहे. ही फक्त आपली निशाणी नसून मिंधे आणि भाजप यांचा भ्रष्ट कारभार जाळून टाकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पटलेली मशाल आहे”, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. मालेगाव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

लोकसभेत फटका बसल्यानंतर आता यांना महाराष्ट्रात बहिणी आहेत आणि त्या लाडक्या आहेत, हे कळलं. आता निवडणुकीच्या तोंडावर बहिणींना 1500 रुपये देऊन त्याच्या मोठ्या जाहिराती करत आहेत. येथे बसलेल्या भावनांना मला विचारायचं आहे की, आपण भाऊबीज आणि रक्षाबंधन साजरी करतो. त्यावेळी भाऊ जे काही बहिणीला देतो, त्या भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची होर्डिंग करून तुम्ही जाहिरात करता का? यांनी बहीण आणि भावाच्या नात्याला व्यवहाराचं रूप दिलं. 1500 रुपये दिले म्हणून माता-बहिणी त्यांच्या नोकर झाल्या, अशा पद्धतीने त्यांची मस्ती सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अनेक शेतकऱ्यांची मुलं पैसे नाहीत, म्हणून शिकू शकत नाहीत. या मुलांना शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. मात्र फीसाठी पैसे नसल्याने ते शाळेत जाऊ शकत नाही. म्हणून मी ठरवलं आहे की, मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं, तसं मी महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

– गेल्या सभेच्या वेळेला मुद्दामून अडथळे निर्माण करण्यासाठी जे खड्डे खोदले होते, ते अजूनही तसेच आहेत. हे रस्ते ज्यांनी खोदले त्यांना मी धन्यवाद देतोय, याचे कारण म्हणजे त्यांनी जो हा खड्डा खोदला आहे, आता गद्दारांना गाडण्यासाठी वेगळा खड्डा खोदण्याची गरज नाही.

– मिंधेंना मी आव्हान देत आहे की, जर तुम्ही मर्दांची अवलाद असाल तर माझ्या वडिलांऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मग मतदानाला या.

– महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, ती शिवसेना महाराष्ट्र लुटून तुम्हाला गुजरातला न्यायची आहेत. महाराष्ट्रात तुम्ही (महायुती सरकारने) काय विकास केला आहे, किती उद्योग, रोजगार आणले आहेत?

– तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं, वरती दादागिरी करत आहेत. दहा दिवस थांबा, नंतर विनासंरक्षण फिरून दाखवा.

– सुप्रीम कोर्टात आपल्या शिवसेनेच्या गद्दारांचा अपात्रतेचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मात्र झालं आता सगळं संपलं आहे. धनंजय चंद्रचूड वाटलं होतं काहीतरी निकाल देतील. मात्र यांनी काही निकाल दिला नाही. देशाच्या लोकशाहीबद्दल निर्णय देताना इतका विलंब लागत असेल तर तुमच्या न्याय हक्कासाठी किती विलंब लागेल.

– शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार.

– फक्त आठ दिवस कळ सोसा. तुम्ही फक्त सरकार नाही, तर तुमचं नशीब बदलणार आहात. तुमच्या आयुष्यात जो काळोख दिसतोय, तो काळोख दूर करण्यासाठी तुमच्या हातात मी मशाल दिली आहे.