उपोषण करणे आमचा व्यवसाय किंवा छंद नाही! पंजाब भाजपच्या नेत्यांनी मोदी यांच्या कार्यालयात जावे – डल्लेवाल

शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी आज व्हिडीओ संदेश जारी करत केंद्राला फटकारले. पंतप्रधान मोदी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी उपोषण सोडेन. उपोषण करणे हा आमचा व्यवसाय किंवा छंद नाही असे सांगताना पंजाब भाजपच्या नेत्यांनी उपोषण संपवण्यासाठी अकाल तख्तशी संपर्क साधला आहे आणि जथेदारांना उपोषण संपवण्यास सांगत आहेत. पण मला वाटते की, भाजपचे नेते चुकीच्या दिशेने जात असून त्यांनी मोदी यांच्या कार्यालयात जाऊन प्रकरण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे डल्लेवाल यांनी स्पष्ट केले.

हरयाणा-पंजाबच्या खनौरी सीमेवर गेल्या 46 दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेले डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वोच्च न्यायालयात अनेकदा याप्रकरणी सुनावणी झाली आहे. डल्लेवाल म्हणाले की, पंजाब भाजपच्या नेत्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या कार्यालयात जावे. ज्यांनी आमच्या प्रश्नावर आधीच चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाला भेट द्यावी.

पंतप्रधानांच्या पुतळय़ाचे दहन

संयुक्त किसान मोर्चाने आज देशातील विविध भागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळय़ाचे दहन केले. ‘संपूर्ण देशाला डल्लेवाल यांच्या प्रकृतीची चिंता आहे. 15 जानेवारीला बैठक होणार आहे. दिल्ली आंदोलनात जथेदार आमच्यासोबत होते आणि ती एकजूट कायम असेल. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱयांशी चर्चा करावी, असे संयुक्त किसान मोर्चाच्या बलबीर सिंग राजेवाल यांनी नमूद केले.